करोना प्रादुर्भावामुळे इव्हेंट इंडस्ट्रीसमोरील आव्हाने - स्वप्नील रास्ते, सविस्तर वाचा

Swapnil Raste, Corona effect on Event Industries,
Corona Virus Effect On Events
(Sinhagad Times) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक क्षेत्रांमध्ये धोका निर्माण झाला आहे. त्यात मनोरंजन क्षेत्र व इव्हेंट इंडस्ट्रीतील मार्च, एप्रिल आणि मे काळातील सर्व इव्हेंट कॅन्सल झाले किंवा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहेत ते ही आगामी काळात होतील की नाही यात शंका आहे, त्यामुळे इव्हेंट इंडस्ट्रीला खूप मोठे नुकसान झाले असून आगामी काळात सर्वात अनेक आव्हानं समोर येण्याची चर्चा आहे. अश्या पार्श्वभूमीवर प्रख्यात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी थर्ड बेल एन्टरटेन्मेंट चे संस्थापक स्वप्नील रास्ते यांनी काही शक्यता व्यक्त केल्या.

सध्या स्पर्धेचे युग मानले जाते आणि त्याचा असणारा कामाचा प्रचंड ताण ह्यामुळे एक स्ट्रेस रिलीफ म्हणून ह्या क्षेत्राकडे पाहिले जाते. जसजसे सामान्य लोक एक प्रेक्षक म्हणून ह्या क्षेत्राकडे वळू लागले तसतसे विवीध कार्यक्रम, महोत्सव, स्पर्धा आदींचे आयोजन विवीध शहरांपासून ते अगदी छोट्या छोट्या गावांपर्यंत येऊन पोहोचले. त्यात छोट्या मोठ्या दुकानांचे उद्घाटन असो, हळदीकुंकवासारखे छोटे छोटे कार्यक्रम असोत ते भव्य दिव्य चार चार दिवसांचे सांस्कृतिक महोत्सव असोत. अशा सर्वच कार्यक्रमांसाठी इव्हेंट मॅनेजमेंट ही संकल्पनाच सुरू झाली व हळू हळू ही एक नवीन इंडस्ट्री म्हणून उभी राहिली. जसजसे क्षेत्र वाढू लागले तसतशा नवनवीन छोट्या मोठ्या कंपन्याही उभ्या राहू लागल्या.

इव्हेंटचा सिझन म्हणजे मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने. आयोजकांनी ज्या काही इव्हेन्टचे आयोजन केले होते ते इव्हेन्ट आयोजकांनी कॅन्सल केले आहेत किंवा अनिश्चित काळासाठी पुढे  ढकलले आहेत, त्यामुळे इव्हेंट इंदूस्ट्रीजचा पूर्ण सिझन तोट्यात गेला असून आगामी येणारा सिझन म्हणजे गणपती, नवरात्री व दिवाळी हा देखील व्यवसायासाठी साधता येईल की नाही ह्या बाबत अनिश्चिता निर्माण झाली आहे. अशावेळी फक्त घाबरून न जाता आलेल्या संकटाचा एकत्रित सामना करणं आज गरजेचं आहे. त्याचबरोबर मोठ्या रकमांच्या गुंतवणुकी करणं देखील ह्या कंपन्यांनी सध्या टाळावे असे वाटते. इतकेच नव्हे तर ज्यांना शक्य आहे त्यांनी आपला स्कीलसेट इतर ठिकाणी जिथे जुळत असेल अशा ठिकाणी तात्पुरते का होईना पण किमान उदरनिर्वाहासाठी इतर पर्यायी मार्ग तपासून बघणे देखील गरजेचे आहे. ह्या काळात मदतीचा हात देणारे जरी अनेक असले तरी ते कायम स्वरुपी नसतात व आपणच आपल्याला संकटातून बाहेर पडण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात हे पूर्ण सत्य आहे. सकारात्मकता वाढविणे, शक्य असल्यास पोटासाठी पर्यायी मार्ग शोधणे, आपली विश्वासार्हता वाढवणे, सतत काहीतरी नवनवीन शिकत रहाणे हे तत्त्व अवलंबले तर संकटावर मात नक्की होऊ शकते. संयम ढळू न देता एकोपा टिकवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, स्पर्धात्मकता थोडी बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र येऊन आपल्या क्षेत्रासाठी काम करणे गरजेचे आहे.
स्वप्नील रास्ते, थर्ड बेल इंटरटंटमेंट

इव्हेंटला जितकी जास्त गर्दी तितका इव्हेंट यशस्वी असे एक समीकरणच जणू गेले काही वर्ष बनले आहे. परंतू आता ह्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याचे बंधन आले आहे. अर्थात ती आपल्या सर्वांच्या हितासाठीच आहेत. परंतु गर्दी नको म्हणून आता कार्यक्रमच बंद झाले तर ह्या प्रचंड प्रमाणात स्थापन झालेल्या कंपन्या आगामी भविष्यात जगणार कश्या? त्यातील कामगार वर्ग आपला उदरनिर्वाह कसा करणार हा प्रश्न प्रामुख्याने निर्माण झाला आहे. त्यात नुसतेच बॅक ऑफिस कामगार नसून अनेक तंत्रज्ञ, छोटे मोठे अनेक कलाकार, ग्राउंड लेव्हल वर काम करणारे ऑन फिल्ड कोऑर्डीनेटर्स, मजूर, बाउन्सर्स, सिक्युरिटी गार्ड हाऊस किपिंग कामगार, वाहतूक करणारा वाहतूकदार, प्रोमोटर आदी अनेकांचा समावेश असतो. लाईट्स, साऊंड, ट्रस, मोठमोठे सेट्स, एल ई डी वॉल्स इत्यादी सामग्रीसाठी प्रचंड प्रमाणात गुंतवणूक ह्या सर्व कंपन्या करत असतात. अनेकांची गुंतवणूक ही मोठ्या कर्जाद्वारे मासिक ई. एम. आय. च्या माध्यमातून ही असते. महिन्याच्या व्यावसायिक उत्पन्नावर त्याचं मासिक री-पेमेंट केलं जातं. व्यवसायच जर बंद पडला तर आगामी काळात अनेक कंपन्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागू शकतो. मोठमोठ्या सेलिब्रिटीज पासूनच ते हातावर पोट असणाऱ्या सर्वांनाच जरी ह्या कोरोना संकटाचा सामना एकत्रित करावा लागत असला तरी उत्पन्न कमी असणाऱ्या कलाकार, मजूर व तंत्रज्ञ आदींना आगामी काळातील उदरनिर्वाहाची चिंता जाणवू लागली आहे. मनोरंजन वा करमणूक ही माणसाच्या आयष्यातील अत्यावश्यक गरज नाही. त्यामुळे  पैसा हाताशी असेल तरच प्रेक्षक ह्या गराजेकडे वळतो. सध्या आहे तो पैसाही पुरवून पुरवून वापरण्याची वेळ सर्वांवरच ओढवली आहे


अभिनेते, गायक, वादक, नर्तक, निवेदक, होस्ट होस्टेस, बाऊन्सर्स, जादूगार, बॅक डान्सर्स, लाईट साऊंड व्यावसायिक, सेट डिझाईनर, डीजेज, व्हीजे आर्टिस्ट्स, स्टेज बिल्डर्स, मंडप डेकोरेटर, ड्रेपरी हाऊसेस, निर्मिती यंत्रणा व्यवस्थापक व कामगार वाहतूक करणारा वाहतूकदार, प्रोमोटर्स, हाऊस किपिंग कामगार,   असे अनेक लोक ह्या व्यवसायावर अवलंबून असतात. ह्यांच्यावर समोर मोठे  संकट उभा राहीले असून त्यांच्या जीवनावर विपरीत असा परिणाम दिसून येत आहे. आगामी काळात अनेकांच्या मानधनात देखील थोडी घट येऊ शकते त्यामुळे सर्वांनीच सहकार्याची भूमिका घेणे गरजेचे आहे, तर आणि तरच ही इंडस्ट्री पुन्हा पहिल्यासारखी उभी राहू शकेल.

Corona Viruse Effect On Events

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.