पुण्यात "भोंदूबाबाची 'हायटेक' अश्लील अघोरी हिडन लिला'! समाजातील एक जळजळीत वास्तव उघडं

 

The-high-tech-hypocrisy-of-Prasad-Dada-alias-Baba-alias-Prasad-Dada-Bhimrao-Tamdar-from-Pune

पुणे : आयटी हब, विद्येचं माहेरघर, वैचारिक चर्चांचं केंद्रबिंदू... अशी ओळख असलेल्या पुण्यात एक असा प्रकार समोर आला आहे, ज्याने समाजमन हादरून गेलं आहे. सूस गावातील प्रसाद दादा भीमराव तामदार (वय २९) या तरुणाने 'बाबा' असल्याचा दावा करत श्रद्धेच्या नावाखाली अश्लील, गुंगी आणणारे, तांत्रिक आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रचलेले भयंकर कारनामे उघडकीस आणले आहेत. त्याने शेकडो भक्तांना 'हिडन अ‍ॅप'द्वारे आपल्या ताब्यात घेतलं, त्यांना गुंगीचं औषध दिलं, आणि त्यांचं खासगी आयुष्य कॅमेऱ्यात कैद करून मानसिक, आर्थिक व लैंगिक शोषण केलं.


हे प्रकरण कोऱ्या, अशिक्षित, ग्रामीण लोकांचं नव्हतं — हे शहरात राहणारे, शिकलेले, सुशिक्षित लोक होते. त्यांनी स्वतःहून बाबा गाठला, त्याच्या ‘ऊर्जा’, ‘ग्रहदोष निवारण’ आणि ‘तांत्रिक उपचारां’वर विश्वास ठेवला, त्याने सांगितलेली अ‍ॅप्स डाऊनलोड केली, आणि शेवटी स्वतःचं आयुष्य बाबाच्या संगणकात लॉक करून दिलं. हे सगळं उघड होतं, तरीही कोणीही प्रश्न विचारला नाही. हीच खरी अध्यात्माची अतिरेकी परिणती होती. 


पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रसाद दादा उर्फ ‘भोंदूबाबा’ हा पुण्यातील काही भक्तगणांशी आध्यात्मिक सल्ल्याच्या नावाखाली संपर्क करत असे. त्यांच्यावर ग्रहदोष, मरणाची वेळ, किंवा अध्यात्मिक अडथळा असल्याचं सांगत तो आधी त्यांचं मन जिंकायचा. भक्तांमध्ये एकदा भीती निर्माण झाली की, तो ‘हिडन अ‍ॅप’ नावाचं एक अज्ञात अ‍ॅप त्यांच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायचा. हे अ‍ॅप त्याला संबंधित व्यक्तीच्या कॅमेऱ्याचा, ऑडिओचा आणि फोल्डरचा सर्वांगीण ताबा देत असे.


पोलिसांनी मिळवलेल्या तपशीलांनुसार प्रसाद हा अत्यंत कावेबाज आणि मानसिक नियंत्रण साधणाऱ्या पद्धतीनं भक्तांवर प्रभुत्व मिळवायचा. तो एखाद्या भक्ताला थेट सांगायचा — "तुझ्यावर मोठं संकट आहे. मृत्यूची सावली आहे. यावर अघोरी उपायच लागेल." या भीतीच्या वातावरणात भक्त आपोआप बाबाच्या अधीन होऊन जायचा.


याचा पुढचा टप्पा अधिक धक्कादायक होता. बाबाने भक्ताला मठात दोन दिवसांत येण्यास सांगितलं की, आधी त्याला ‘आध्यात्मिक जागरण’ करायला सांगितलं जायचं. सलग दोन रात्र जागरण, सतत मंत्रजप, आणि झोप न लागेल यासाठी कुटुंबियांना स्पष्ट सूचना दिल्या जायच्या.


या शारीरिक आणि मानसिक थकव्याच्या अवस्थेत भक्त जेव्हा मठात पोहोचायचा, तेव्हा त्याची स्थिती कमकुवत आणि अर्धवट शुद्धीत असायची. बाबा त्याला 'पूजेसाठी' सर्व कपडे काढायला सांगायचा आणि फक्त एक शाल पांघरायला द्यायचा. पुढे काही ‘तांत्रिक’ विधींचा थोतांड करत, तो त्याला "थोडा वेळ झोप घे" असं सांगून, त्याच्या झोपेचा गैरफायदा घ्यायचा.


कुटुंबीयांना बाहेर थांबवून, बाबा त्या अर्धशुद्ध भक्तावर लैंगिक चाळे करत असे. पीडित भक्ताला जर काहीसा भान आले, तर बाबा त्याच्या समोर विनयशील चेहरा करत म्हणायचा, "तुझं संकट मी माझ्यावर घेतलंय. तेव्हा तू आता मुक्त आहेस." काहीजण या थरारानंतर स्तब्ध राहायचे, काहींना आपण अनुभवलेल्या गोष्टी स्वप्न वाटायच्या – आणि नेमकं हेच बाबाचं मुख्य शस्त्र होतं.


या अ‍ॅपच्या सहाय्याने तो भक्तांचे खासगी क्षण टिपून ठेवायचा. पुढे तो त्यांना पाणी किंवा प्रसादात गुंगीचं औषध देऊन त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा. हे करताना तो सांगायचा की, "तुझ्या जीवनातील दोष मी स्वतःवर घेतोय", किंवा "ही तांत्रिक प्रक्रिया आहे, मी तुला मुक्त करतोय." अस्वस्थ अवस्थेत काय सुरू आहे, हे कळण्याइतपतही त्या व्यक्तीचं भान राहत नसे.


याच दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून ३ मोबाईल, एक डिजिटल पॅड, सहा पेनड्राइव्ह, चार मेमरी कार्ड आणि निद्रानाश तसेच गुंगी आणणाऱ्या गोळ्यांचे पॅकेट हस्तगत केले आहे. याशिवाय, त्याने एका लॅपटॉपमध्ये कित्येक अश्लील व्हिडीओ, गुप्त नोंदी व ब्लॅकमेलिंगसाठी उपयोग होणारा डेटा ठेवला असल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे.


पाच वेगवेगळ्या व्यक्तींनी दिलेल्या जबाबांनुसार, बाबाने 'संकट येणार' म्हणून भीती दाखवून त्यांना अ‍ॅप डाउनलोड करायला लावलं, गुंगी आणून जबरदस्ती केली, अश्लील कृती करत असल्यासारखी अभिनय केलेली 'तांत्रिक पूजा' चालवली. एका व्यक्तीने जेव्हा यास विरोध केला, तेव्हा बाबाने एका कागदावर त्याचा मृत्यू कधी होणार याची 'तारीख' लिहून दिली!


पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, त्याची पोलिस कोठडी चार दिवसांनी वाढवण्यात आली आहे. तपासाचा फोकस आता त्याने जमा केलेल्या संपत्तीवर, संस्थेच्या कायदेशीर अस्तित्वावर आणि इतर कोणकोण त्या जाळ्यात सामील होते यावर केंद्रित आहे.


या प्रकरणाने समाजात एकच प्रश्न उपस्थित केला आहे — लोक असं फसतातच कसे?

उत्तर शोधायचं झालं, तर समाजात अजूनही अंधश्रद्धा, अध्यात्माचा अतिरेक, आणि व्यक्तिगत संकटांतून मार्ग शोधताना 'शॉर्टकट' शोधण्याची मानसिकता बळकट असल्याचं स्पष्ट होतं. व्यक्ती जेव्हा संकटात असते, तेव्हा विज्ञानापेक्षा विश्वास त्याला जवळ वाटतो. आणि हीच भावना भोंदूबाबा आणि त्यांच्यासारखे ‘हायटेक’ ठग चपळपणे ओळखतात. ते आध्यात्मिक भाषा वापरतात, पण त्यांचे साधनं मात्र डिजिटल – अ‍ॅप्स, स्क्रीन रेकॉर्डिंग, सायबर धमक्या आणि ब्लॅकमेल.


समाजात तांत्रिक साक्षरता कमी आहे, लोक मोबाइलमध्ये कोणत्या अ‍ॅपला कोणती परवानगी द्यायची याबाबत अनभिज्ञ आहेत. शिवाय, अशा फसवणुकीनंतर बरेच लोक समाजापुढे ‘लज्जा’, ‘अपमान’, ‘भय’ या भावनांमुळे मौन बाळगतात – आणि अशाच परिस्थितीत हे भोंदूबाबा अधिक बिनधास्त होतात. अध्यात्म, मूलतः, आत्मशांती, अंतर्मुखता आणि मानसिक संतुलन साधण्याचं साधन आहे. पण जेव्हा हेच अध्यात्म व्यक्तीच्या विवेकावर मात करतं, तेव्हा ते अतिरेकाचं रूप धारण करतं — आणि इथेच सुरू होतो अंधश्रद्धा, फसवणूक, आणि मानसिक गुलामीचा खेळ.


आज हे प्रकरण उघड झालं, पण हे पहिलं की शेवटचं भोंदूबाबा प्रकरण नाही. समाजाने आता गाफील राहण्याचा प्रश्नच येत नाही. पुण्यासारख्या प्रबुद्ध शहरातही जर ही ‘हिडन लिला’ सहज उलगडत असेल, तर ग्रामीण भागांतील वा डिजिटलदृष्ट्या मागास समाजात ही घाण किती खोलवर आहे, याची कल्पना करवत नाही.


अध्यात्म हे मुळात अंतर्मुखतेचं, स्वअन्वेषणाचं माध्यम असावं. पण तेच जेव्हा गुरू, बाबा, साधू यांच्या नावावर 'विक्रीयोग्य सेवा' बनतं, तेव्हा ते अध्यात्म राहात नाही – ते व्यवसाय आणि शोषणाचं हत्यार बनतं. आज बाबांचे 'सेशन', 'तांत्रिक साधना', 'ऊर्जेचे उपाय', 'फोनवर समाधान' यांचा दर हजारांत मोजला जातो. त्याला श्रद्धा दिली जाते, विज्ञानाला नाही. हे वास्तव आपण नाकारू शकत नाही.


या अतिरेकात फक्त आर्थिक शोषण नाही, तर मानसिक गुलामगिरीची भीषण साखळी आहे. एकदा का एखादा गुरु भक्ताच्या मनात 'तूच दोषी आहेस, तुझं नशिब खराब आहे' असं ठसवतो, तेव्हा तो भक्त पूर्णपणे त्याचं नियंत्रण त्याच्या हाती देतो. पुढचं काम मग 'हिडन अ‍ॅप'पासून सुरू होतं. यात बाबाचं कौशल्य नव्हे – तर समाजाचा विवेक हरवलेला असतो.


या सगळ्या पार्श्वभूमीवर लोक अडाणी आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल. लोक तांत्रिकदृष्ट्या अडाणी नसतील, पण भावनिकदृष्ट्या गोंधळलेले आहेत. संकटं, दु:खं, नात्यातील अडचणी, करिअरची अनिश्चितता – या सगळ्यांमधून तात्पुरता दिलासा मिळावा म्हणून ते बाबाकडे जातात. पण त्या शोधात त्यांना समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ, किंवा मित्र न मिळाल्यामुळे बाबा हा पर्याय वाटतो. आणि तिथेच सुरू होते फसवणूक.


आता वेळ आली आहे ती अंधश्रद्धेवर आणि डिजिटल फसवणुकीवर एकत्रितपणे प्रहार करण्याची. श्रद्धा ठेवा – पण डोळस, वैज्ञानिक आणि सशिक्षित पद्धतीने. कारण हिडन अ‍ॅप नव्हे, तर 'हिडन एज्युकेशन' हाच यावरचा खरा उपाय आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.