पुणे, दि. ३ (प्रतिनिधी):राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे शुक्रवारी (दि. ४ जुलै) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणाऱ्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला वादाची किनार लाभली आहे. थोरले बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या वंशाचा दावा करणारे नवाब शदाब अली बहादूर पेशवा नवाब ऑफ बांदा यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत आयोजनकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
"व्यासपीठावर नाही, इतिहासातही आम्हाला दडपले!" नवाब शदाब अली बहादूर यांनी सांगितले की, “कार्यक्रमाचे आमंत्रण मला फक्त दोन दिवसांपूर्वी देण्यात आले. त्याहीपेक्षा दु:खद म्हणजे आयोजकांनी स्पष्टपणे सांगितले की, मला व्यासपीठावर स्थान दिले जाणार नाही. हा केवळ माझा नाही, तर मस्तानी घराण्याचा आणि पेशव्यांच्या ऐतिहासिक परंपरेचा अपमान आहे.”
ते पुढे म्हणाले की, “सध्याचे पुण्यातील पेशवे वंशज हे वाराणसी येथून दत्तक घेतले गेले आहेत, परंतु मी थोरले बाजीराव पेशवे व मस्तानी यांचे थेट रक्तवंशज आहे. माझे पूर्वज समशेर बहादूर यांनी १७६१ मध्ये पानिपतच्या युद्धात लढा दिला होता. माझे पणजोबा अली बहादूर यांनी १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंसोबत शौर्य गाजवले.”
डीएनए तपासा – "खरा वंशज कोण?"
आपल्या वंशाच्या प्रामाणिकतेवर विश्वास व्यक्त करत नवाब शदाब अली बहादूर म्हणाले, “जर शंका असेल, तर मी डीएनए चाचणीसाठी सज्ज आहे. आम्हीच बाजीराव-मस्तानी यांचे खरे वंशज आहोत.”
“आम्ही कार्यक्रम पेशव्यांसाठी करतो, वंशजांसाठी नाही”– आयोजक स्पष्टीकरण
या आरोपांवर बाजीराव पेशवा प्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष कुंदन कुमार साठे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “हा कार्यक्रम पेशव्यांच्या ऐतिहासिक स्मृतीस समर्पित आहे, वंशजांच्या गौरवासाठी नव्हे. मस्तानीच्या वंशजांविषयी आमच्याकडे आदर आहे, पण व्यासपीठावर बसण्यास जागेची मर्यादा असल्याने त्यांना खाली बसण्यास सांगण्यात आले. यावरून एवढा आक्षेप घेण्याचे कारण नाही.”
राजकीय पातळीवर ‘इतिहासाचा अपमान’?
नवाब शदाब अली बहादूर यांनी थेट आरोप केला की, “हा सर्व प्रकार अमित शहा यांच्यासमोर खोटा इतिहास सादर करण्याचा प्रयत्न आहे. ते इतिहासप्रेमी असून त्यांनी स्वराज्यावर पुस्तकही लिहिले आहे. त्यांच्या समोरच खरी परंपरा दडपली जाते आहे.”