पुणे : प्रतिनिधी — पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरेची समृद्ध पार्श्वभूमी लाभली आहे. याच परंपरेचा वारसा जपत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे यंदाही भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले आहे. जगप्रसिद्ध बासरीवादक आणि पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या शुभहस्ते गणरायाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण राहणार असून, त्यानंतर बाप्पाची भव्य आगमन मिरवणूक वाजत-गाजत निघणार आहे. ढोल-ताशांचा निनाद, शंखनाद आणि पारंपरिक वाद्यांच्या मंगलध्वनीने संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे. उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सव्वा आठ वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनापासून श्रींच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे.
या मिरवणुकीत श्रीराम पथक, नादब्रह्म, ज्ञानप्रबोधनी, आवर्तन, वाद्यवृंद, समर्थ, शिवाय, इंद्र गर्जना आणि केशव शंखनाद यांसारखी ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर आढावा बंधू यांचा नगरखाना आणि मर्दानी खेळ हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
ढोल-ताशांच्या निनादात बाप्पाचे आगमन
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनापासून सुरू होणारी ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक आणि बाजीराव रस्ता या मार्गाने पुढे जाणार आहे. पारंपरिक वाद्यांचा मंगलनाद आणि गणरायाच्या जयघोषात श्रींचे आगमन गणेश सुवर्णधाम या सजावट मंदिरात होणार आहे. आगमन मिरवणुकीनंतर दुपारी साडेबारा वाजता पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते श्रींची विधिवत प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवाच्या प्रारंभीच भक्ती, संगीत आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.
बासरीच्या मंगल सुरांसोबत गणरायाची प्राणप्रतिष्ठा
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाला भारतीय शास्त्रीय संगीतात विशेष स्थान आहे. त्यांच्या हस्ते होणारी गणरायाची प्राणप्रतिष्ठा हा भाविकांसाठी आध्यात्मिकदृष्ट्या विशेष क्षण ठरणार आहे. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेच्या मंगल सोहळ्यात सहभागी होऊन श्रींचे आशीर्वाद घेण्यासाठी पुणे शहरासह विविध भागांतील गणेशभक्त उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. उत्सव प्रमुख पुनीत बालन यांनी सर्व गणेशभक्तांना या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
“दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाजत-गाजत मिरवणुकीनंतर जगप्रसिद्ध बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. सर्व गणेश भक्तांनी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहावे.” - पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट
भक्तीचा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि बासरीच्या मंगल सुरांचा संगम… अशा भक्तिमय वातावरणात पुण्याच्या ऐतिहासिक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.

