धायरी: शहराच्या प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा आणखी एक बळी धायरी परिसरात पाहायला मिळाला. नऱ्हे येथे रस्त्यावरील खोल खड्ड्यात दुचाकी घसरून पडल्याने सचिन हंगे (वय ३९, रा. धायरी) या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सचिन हंगे हे धायरीतील चव्हाण महाविद्यालयात शिक्षक होते. त्यांच्या मृत्यूनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून, संतप्त नागरिकांनी ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे.
ही हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ६ जुलै) पहाटेच्या सुमारास घडली. हंगे हे आपल्या दुचाकीने धायरी फाटा ते नऱ्हे दरम्यानच्या रस्त्याने जात असताना अचानकपणे सिमेंट काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात त्यांच्या दुचाकीचे चाक अडकले. खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा तोल गेला व ते रस्त्यावर आपटले. डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र मंगळवारी (दि. ८ जुलै) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या अपघातानंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते भूपेंद्र मोरे यांनी या मृत्यूला थेट महापालिकेची निष्काळजी व्यवस्था आणि ठेकेदाराची उदासीनता जबाबदार धरली आहे. त्यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कलम ३०४ (अ) अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
भूपेंद्र मोरे म्हणाले, “हे केवळ अपघाती मृत्यू नाही, तर शहराच्या बकाल व्यवस्थेचा बळी आहे. जोपर्यंत जबाबदारांवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत अशा मृत्यू रोखता येणार नाहीत.”
सदर व्यक्ती हे आमच्या हॉस्पिटल समोरील रस्त्यावर दुचाकीवरून पडले. त्यावेळी त्यांच्या कानातून प्रचंड रक्तस्त्राव होत होता त्यांना प्राथमिक उपचार केले केले. व पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी नेण्यात आले. - डॉ. किरण भालेराव प्रत्यक्षदर्शी
शहरातील रस्त्यांवरील खड्डे ही केवळ गैरसोय नव्हे तर सरळ जीवघेणी समस्या बनली आहे. एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते बनवले जात असतानाही त्यांची निकृष्ट गुणवत्ता, देखभाल दुरुस्तीचा अभाव आणि अपयशी नियोजन या सर्वांचा परिणाम नागरिकांच्या जीवावर होत आहे.
सचिन हंगे हे आपल्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध पालक असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसर शोकाकुल झाला आहे.