पुणे: डिजिटल पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल मटा डिजिटल (महाराष्ट्र टाइम्स डिजिटल) चे पत्रकार अभिजीत दराडे यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र – मुंबई यांच्यातर्फे "डिजिटल स्टार पुरस्कार २०२५" प्रदान करण्यात आला. काल दिनांक २५ मे रोजी पुण्यातील JW Marriott या ठिकाणी पार पडलेल्या भव्य समारंभात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या पुरस्कार वितरण सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना अभिजीत दराडे म्हणाले, "हा सन्मान केवळ माझा नाही, तर मटा डिजिटलच्या संपूर्ण टीमचा आहे. समाजप्रबोधन, लोकाभिमुख पत्रकारिता आणि डिजिटल माध्यमांच्या सकारात्मक वापरासाठी ही पावती असल्याची भावना मला वाटते."
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या गुणवत्ताधिष्ठित पत्रकारांना दिला जाणारा "डिजिटल स्टार पुरस्कार" हा मानाचा पुरस्कार आहे. माध्यमांच्या नव्या स्वरूपात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचे योगदान अधोरेखित करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. अभिजीत दराडे यांचे कार्य आणि त्यांना मिळालेला हा सन्मान हे नव्या पिढीतील डिजिटल पत्रकारांसाठी प्रेरणादायक ठरेल, यात शंका नाही.
कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, लोकार्पण सोहळा, आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कारही पार पडला. राज्यभरातील पत्रकार, संपादक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.