कात्रज: धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शिवसेना (शिंदे गट) चे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात वादावादी झाल्याने बैठकीचे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आयोजित बैठकीत दोन सत्ताधारी गटांचे पदाधिकारी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसल्याने, ही घटना स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.
बैठकीदरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा, अनधिकृत बांधकाम आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर चर्चा सुरू होती. यावेळी पद्मावती परिसरातील एका महिलांनी आपल्या सोसायटीजवळ असलेल्या झोपडपट्टीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली. यावर शिंदे गटाचे उद्धव कांबळे यांनी आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला असता, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांनी त्यांना बोलण्यास मज्जाव केला.
कांबळे यांनी नंतर बोलताना संबंधित जागा पूर्वी सुभाष जगताप यांचीच होती, असे सांगितल्यावर वाद उफाळून आला आणि दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही हस्तक्षेप करून बैठकीचे वातावरण पुन्हा शांत केले.
या घडामोडीनंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात पुन्हा धुसफूस सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, "ही वैयक्तिक पातळीवरील चकमक होती. महापालिकेच्या कामाशी तिचा काही संबंध नाही," असे स्पष्टीकरण सहायक आयुक्त सुरेखा भणगे यांनी दिले. त्यांनी असेही सांगितले की, बैठकीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि अनेक समस्यांवर समाधानकारक चर्चा झाली.