"पुणे विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्र्याच्या 'एन्ट्री'मुळे विमानाला एग्झिट; पुणे विमानतळावर तब्बल ५७ मिनिटं प्राणी तांडव!"

pune-air-india-express-flight-aborts-landing-due-to-dogs-on-runway-at-lohegaon-airport

पुणे: एअर इंडिया कंपनीच्या मागे गेले काही दिवस अपघातांची आणि तांत्रिक बिघाडांची मालिका थांबायचे नाव घेत नाही, आणि आता पुण्यातही एक धक्कादायक घटना घडली आहे. भुवनेश्वरहून पुण्याला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला लँडिंगच्या अंतिम टप्प्यावर धावपट्टीवर कुत्रा दिसल्यामुळे लँडिंग थांबवावं लागलं. परिणामी हे विमान तब्बल ५७ मिनिटं हवेतच घिरट्या घालत होतं. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. AI एक्स 1097 हे विमान पुणे विमानतळावर उतरायला आले असताना, अवघ्या १०० ते १५० फूट उंचीवर असताना वैमानिकाच्या लक्षात आले की धावपट्टीवर कुत्रा आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने तत्काळ ‘गो-अराउंड’ निर्णय घेत विमान पुन्हा हवेत झेपावले.


 सुरक्षित लँडिंग, पण घबराट मात्र मोठी

ही कृती अत्यंत तांत्रिकदृष्ट्या अचूक होती. कारण जर विमान आणखी थोडं खाली आलं असतं, तर विमान पुन्हा हवेत नेणं अत्यंत कठीण ठरलं असतं आणि अपघाताची शक्यता वाढली असती. या घटनेनंतर एअर ट्रॅफिक कंट्रोलने धावपट्टी तातडीने रिकामी केली. संबंधित कर्मचाऱ्यांनी कुत्रा हटवल्यानंतरच विमान सुरक्षितपणे लँड करण्यात आले.


या दरम्यान, विमानातील प्रवाशांमध्ये तीव्र घबराट निर्माण झाली होती. अनेकांना आधीच अहमदाबादच्या एअर इंडिया अपघाताची आठवण झाली, ज्यामध्ये २७५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेला अद्याप महिना उलटत नाही तोच पुण्यात अशी घटना घडल्याने हवाई सुरक्षेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


हवाई सुरक्षेची लाज? धावपट्टीवर कुत्रा कसा पोहोचतो?

विशेष म्हणजे हा पहिलाच प्रकार नाही. पुणे विमानतळावर पूर्वीही कुत्रे, मांजरे, घुबडं, किंवा अन्य प्राणी धावपट्टीवर आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून विमानतळ परिसराची बाउंड्री वॉल, सुरक्षा कर्मचारी आणि जनावरांना रोखण्याची व्यवस्था याबाबत महत्त्वाच्या त्रुटी समोर येत आहेत.


या प्रकारावर अद्याप एअर इंडिया किंवा नागरी उड्डाण मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन आलेले नाही. मात्र हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रवासी संघटनांनी या प्रकाराची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आणि धावपट्टी सुरक्षाव्यवस्था तातडीने सुधारण्याची मागणी केली आहे. 


पुणे विमानतळासारख्या मेट्रो दर्जाच्या शहरात असलेल्या विमानतळावर अशी घटना घडणे ही अत्यंत निष्काळजी वृत्तीचं लक्षण आहे. एखादा वैमानिक प्रसंगावधान गमावला असता, तर ही दुर्घटना मोठी ठरली असती. त्यामुळे नागरी उड्डाण मंत्रालयाने आणि पुणे विमानतळ प्रशासनाने याबाबत तत्काळ आणि शिस्तबद्ध उपाययोजना राबवणं अत्यावश्यक आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.