मुंबई: पुण्याचे सांस्कृतिक वैभव असलेले राजा दिनकर केळकर संग्रहालय आता नव्या रूपात ‘म्युझियम सिटी’ म्हणून विकसित होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यासंदर्भातील विविध निर्णय घेण्यात आले. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, अपर मुख्य सचिव विकास खरगे, राजगोपाल देवरा, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बावधन बुद्रूक येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या ६ एकर शासकीय जागेवर हे नवे संग्रहालय उभारले जाणार आहे. सध्या जुन्या संग्रहालयात जागेअभावी केवळ ११ टक्के वस्तूच प्रदर्शित करता येतात. नव्या संकल्पनेनुसार, १४व्या शतकापासूनच्या २०,००० हून अधिक दुर्मीळ वस्तूंना योग्य सादरीकरण मिळणार आहे.
बैठकीत पर्यटक व नागरिकांच्या सोयीसाठी दुचाकी, चारचाकी आणि बससाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था ठेवण्याचा निर्णय झाला. दर्जेदार, आकर्षक आणि शाश्वत बांधकाम करण्याचे निर्देश अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. संग्रहालयाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी प्रशासकीय समितीची स्थापना केली जाणार असून, नामांकित वास्तुविशारदांच्या माध्यमातून सविस्तर आराखडा तयार केला जाणार आहे.
विशेष म्हणजे, नव्याने उभारल्या जाणाऱ्या या संग्रहालय प्रकल्पाला देखील ‘राजा दिनकर केळकर संग्रहालय’ हेच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, जेणेकरून मूळ वारसा आणि दृष्टीकोन अबाधित राहील.