पुणे: वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावरून सहभागी होणारे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट हे जगभरातील गणेशभक्तांसाठी मुख्य आकर्षण असते. मात्र, यावर्षीपासून सायंकाळनंतर विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होता, मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय या दोन्ही मंडळांनी घेतला आहे.
याविषयी माहिती देण्याकरिता आयोजित पत्रकार परिषदेला अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त, उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, अखिल मंडई मंडळाचे संजय मते, विश्वास भोर आदी उपस्थित होते.
अण्णा थोरात म्हणाले, गणेशोत्सव हा धार्मिक उत्सव असून संपूर्ण दहा दिवस त्याचे महत्व आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे विसर्जन. यावर्षी अनंत चतुदर्शी (दि.६ सप्टेंबर) च्या दुसऱ्या दिवशी (दि.७ सप्टेंबर) खग्रास चंद्रग्रहण असल्याने ग्रहणकाळात देवाच्या सर्व मूर्ती झाकून ठेवण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुपारी १२ पूर्वी मंडळाच्या मूर्ती मंदिरात पुन्हा येणे आवश्यक्य आहे.
मागील तीन वर्षे पोलिसांनी दिलेल्या वेळेस सा.७ वा श्री ची आरती करून मिरवणुकीत सामील होण्यासाठी तयार असतो पण गेली काही वर्षे पोलिस प्रशासनाने शब्द पाळला नाही. त्या मुळे सायंकाळी मिरवणुकीत सामील होण्यासाठी आम्ही तयार असूनही आम्हाला वेळेवर सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यंदा आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व गणेशोत्सव मंडळांना देखील आम्ही आवाहन करीत आहोत की यंदा मिरवणूक रविवारी दुपारी १२ पूर्वी संपवावी.
पुनीत बालन म्हणाले, ग्रहणकाळ रविवारी (दि.७) दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी सुरु होत आहे. किमान त्याआधी अर्धा तास सर्व गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती मंदिरात नेणे आवश्यक आहे. याकरिता मिरवणूक लवकर संपविणे आवश्यक असून आम्ही मानाचे पाच गणपती टिळक पुतळा चौकातून मार्गस्थ झाल्यानंतर त्या पाठोपाठ मिरवणुकीत सहभागी होणार आहोत. सर्व गणेशमंडळांनी देखील याबाबत सहकार्य केल्यास पोलिस आणि प्रशासना यंत्रणेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.