पुणे: प्रतिनिधी – संपूर्ण जगात प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवात लाखो भाविक येत असतात मात्र पोलिसांची संख्या ही तुलनेत कमी असते. त्यामुळे गणेश मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पोलिसांसारखे काम करावे, असे आवाहन पश्चिम विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे यांनी केले.
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चा वासा पूजन कार्यक्रम बनसोडे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंडळाचे सुनिल रासने, तुळशीबाग मंडळाचे विकास पवार, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रशांत टिकार, कसबा गणपती मंडळाचे श्रीकांत शेटे, छत्रपती राजाराम मंडळाचे अरुण गवळे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे, पोलिस निरीक्षक प्रशांत भुरुमे, संतोष पांढरे, अरुण घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बनसोडे म्हणाले, ‘‘हिंदुस्थानातील पहिले सार्वजनिक गणेश मंडळाच्या वासा पूजनाचा मान दिल्याबद्दल मी ट्रस्टचा आभारी आहे. गणेशोत्सवाची आता सुरवात होत आहे. हा उत्सव निर्विघ्नपणे साजरा होईल, त्यासाठी रंगारी ट्रस्टसह सर्व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची आम्हाला मदत होईल, असा विश्वास आहे.’’ वासा पूजन सोहळ्यापुर्वी रंगारी भवनात बाप्पाची आरती झाली. यावेळी शिवमुद्रा ढोल ताशा पथकाने केलेल्या वादनाने उपस्थित गणेश भक्तांची मने जिंकली.
‘‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वासा पूजन सोहळ्याने गणेशोत्सवाची सुरवात झाली आहे. यावर्षी आम्ही रत्नमहल हा देखावा साकारणार आहोत. भारतील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आणि मोती यांचा मिलाप या रत्नमहलमध्ये असणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही रथाला बैलजोडी न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तो यावर्षीही कायम राहणार आहे.’ - पुनीत बालन, उत्सव प्रमुख व विश्वस्त.