धायरी: धायरी येथील उंबऱ्या गणपती चौक ते धारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची अवस्था पुन्हा एकदा नागरिकांच्या त्रासाचे आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे दर्शन घडवणारी ठरली आहे. अवघ्या दीड महिन्यापूर्वी नव्याने तयार करण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसाळ्यात अक्षरशः उखडून गेला असून, त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांची मालिका, डबक्यांचे जाळे आणि निचऱ्याचा अभाव दिसून येतो.
धायरीकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून, धैर्य ठेवून, अखेर मे महिन्याच्या अखेरीस रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळवला. काही माजी लोकप्रतिनिधींनी या कामाचे श्रेय घेण्यासाठी मोठमोठे फ्लेक्सही लावले. मात्र, त्याच्या फक्त पंधरा दिवसांतच जोरदार पावसामुळे या रस्त्याची धुळधाण झाली. महापालिकेने नागरिकांच्या तक्रारींनंतर पॅचवर्क करून ‘देखावा’ केला, पण सततच्या संततधारेने तोही वाहून गेला. परिणामी, नागरिक पुन्हा जुन्याच समस्येत अडकले आहेत.
हा रस्ता नऱ्हे एमआयडीसी, बेनकर वस्ती, धारेश्वर मंदिर, आणि अन्य वसाहतींसाठी मुख्य संपर्क मार्ग आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ सातत्याने असते. रस्त्याच्या खड्ड्यांमुळे अनेक वाहनचालकांनी गाड्या घसरून पडल्याच्या, सस्पेन्शन आणि चाकांचे नुकसान झाल्याच्या, तसेच शरीराला दुखापती झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.
"रस्ते आहेत की सापळे?" असा सवाल सध्या पुणेकरांना भेडसावत आहे. धायरीतील हा रस्ता हे प्रशासनाच्या नियोजनशून्यता आणि ठेकेदारांच्या निष्काळजीपणाचं ठळक उदाहरण बनला आहे. पावसाचा दोष देत याच चक्रात प्रशासन व सामाजिक प्रतिनिधी सटकतात, पण त्रास मात्र सामान्य नागरिकांनाच सहन करावा लागतो – तोही वर्षानुवर्षं! या भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे अशा महत्वाच्या रस्त्यावर योग्य जलनिस्सारण आणि दर्जेदार बांधकाम ही काळाची गरज आहे. प्रशासनाने या रस्त्याची पुन्हा स्थल पाहणी करून, योग्य डिज़ाइन आणि गुणवत्तेचे काम तात्काळ करणे गरजेचे आहे, असे स्थानिकांचा आग्रह आहे.
नागरिकांचा संताप – 'याला उत्तरदायी कोण?'
धायरीतील नागरिक विचारत आहेत
इतक्या वर्षांनंतर रस्ता मंजूर झाला, तोही पंधरा दिवसात उखडतो म्हणजे काय?
पावसाळ्यापूर्वी नाल्यांची तयारी का केली नाही?
वारंवार पॅचवर्क करून निधीचा अपव्यय केला जातो का?
अपघातांची जबाबदारी कोण घेणार?