शरद पवार नावाचं गारुड... राजा माने


Raja Mane's thoughts about Sharad Pawar


मुंबई: खरं तर आज शरद पवार साहेबांबद्दल काही लिहिण्याचे विशेष निमित्त नाही... पण माझे सोलापूरचे उद्योजक मित्र राजूशेठ राठी यांनी दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पवार साहेबांसोबत झालेल्या माझ्या भेटीचे फोटो पाठविले आणि माझ्या भूतकाळाची दारे खाडकन खुली झाली!.. शरद पवार नावाचं गारुड..१९७८ नंतरचा काळ.. महाराष्ट्राच्या राजकारण-समाजकारणाला नवा चेहरा देणाऱ्या नवसंस्कृती जन्म प्रक्रियेचा तो काळ...  महाराष्ट्राची अस्मिता,जाणता राजा आणि "आमचे साहेब" या शब्दांनी सर्व जाती-धर्मातील तरुणांच्या थेट हृदयाशी नाते जोडलेला काळ..शरद पवार नावाच्या गारुडाने उभा महाराष्ट्र झपाटलेला काळ!..त्याच शरद पवार नावाच्या गारुडाने  त्याकाळी झपाटलेला मी एक त्या काळातील विद्यार्थी-युवक..मीच नव्हे महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबं या गारुडाने व्यापली होती. बरं त्या झपाटण्याला तथाकथित डाव्या-उजव्या विचारांच्या भिंती किंवा जाती-पातीची लेबल्सही नव्हती.. फक्त शरद पवार! अहो,या गारुडाचा अनेक कुटुंबांवर एवढा प्रभाव होता की,माझे सोलापूरचे मामा स्वर्गीय सुखदेव पवार यांनी मुलांचं नावही "शरद" ठेवले!



 मला गमतीने आणि कुतुहलाने नेहमी प्रश्न पडतो की, त्या काळात राज्यातील किती बरे पवार कुटुंबांनी आपल्या बाळाचे नाव शरद ठेवले असेल?..असो.१९७८ ते १९८५ या काळात माझं शिक्षण, क्रिकेट, नाट्य,समाजकारण आणि समोर येईल त्या विषयात धडपड सुरु होती.नेमक्या त्याच काळात शरद पवार साहेबांनी एस् काँग्रेसची आणि पुरोगामी लोकशाही दलाची अर्थात पुलोदची स्थापना केली.आमच्या बार्शीत साहेबांचे निष्ठावंत माझे मित्र मुकुंद सोमाणी यांचे वडिल रामचंद्रभाऊ (काकाजी), स्वर्गीय अर्जूनराव तथा बारबोले अण्णा आणि हरहुन्नरी युवानेते दिलीप सोपल (त्यावेळी आम्ही त्यांना वकील साहेब म्हणायचो!) ही नेते मंडळी एस काँग्रेसमध्ये सक्रीय झाले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बिनीचे शिलेदार आणि माझे मित्र अतुल दिक्षित याचे वडिल ज्येष्ठ पत्रकार मुकुंदराव दादाही पुलोद मध्ये सक्रीय झाले. मग मीही दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली एस. काँग्रेसमध्ये फक्त सक्रीयच झालो असे नाही तर थेट युवक एस काँग्रेसचा सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष झालो. 


माझ्या जीवनात शरद पवार नावाच्या गारुडाचे वास्तव्य अधिक दृढ होत राहिलै.पुढे दिलीप सोपल यांनी १९८५ साली  पहिली निवडणूक लढली. मी त्या निवडणुकीत युवा संघटन आणि भाषणबाजीत आघाडीवर असे. सोपल यांच्या विधीमंडळातील कारकिर्दीची मुहूर्तमेढ रोवली गेली. मीही त्याच वळणावर राजकारण सोडून लोकमत मध्ये प्रशिक्षणार्थी उपसंपादक बनून श्रमिक पत्रकारितेचा श्री गणेशा केला! जीवनाचा मार्ग बदलला पण पवार साहेबांवरील प्रेम आणि श्रध्दा मात्र कायम राहिली. पत्रकारिता करीत असताना अनेकदा साहेबांवर टीकाही करावी लागली. साहेबांच्या पहिल्या भेटी पासून ते अगदी अलीकडच्या काळात साहेबांनी मला बोलावून घेवून स्वर्गीय गणपतराव देशमुख आबांवर पुस्तक लिहिण्याच्या केलेल्या सूचनेपर्यत अनेक घटना घडामोडींवर खूप खूप लिहिण्यासारखं आहे.. पण आज लिहायचा मोह झाला तो दोन वर्षांपूर्वी साहेबांच्या जालना येथे झालेल्या भेटीचे फोटो पाहून!.. शेवटी माझ्या आणि माझ्या सारख्या असंख्य लोकांच्या मनावर राज्य करणारे शरद पवार नावाचे भारुड तहहयात राहणार आहे.

-राजा माने


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.