लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागत असल्याचे पाहून संताप येतोय

 


पिंपरी: मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीमध्ये अंत्यविधीसाठी जागाच शिल्लक नसल्याचे समोर आले. यावर पर्याय म्हणून पदपथ फोडून त्या जागेत दफनविधी करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यावर राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी टि्विट केले. लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागत असल्याचे पाहून संताप येतोय. ही विटंबना तत्काळ थांबवा. आपण नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार पुरवू शकत नाही? असा सवाल पार्थ पवार यांनी उपस्थित केला आहे.


मोरवाडी येथील शिवकैलास लिंगायत दफनभूमीत मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, महात्मा फुलेनगर, विद्यानगर, दत्तनगर, आनंदनगर, साईबाबानगर, इंदिरानगर, मोरवाडी, लालटोपीनगर, अण्णासाहेब नगर, शाहुनगर, संभाजीनगर आदी परिसरातील नागरिक अंत्यविधीसाठी येतात. मात्र, जागा माळरानाची असल्यामुळे दफन करण्यासाठी खड्डा खोदाईसाठी खूप परिश्रम घ्यावे लागत आहे.




ऑटोक्लस्टरच्या जागेत शिवकैलास लिंगायत दफनभूमी क्रमांक दोन तयार झाली. दफनभूमी क्रमांक एक येथील अंत्यविधीसाठी जागा संपल्यामुळे दोन क्रमांकाच्या दफनभूमीत अंत्यविधी करण्यास सुरवात झाली. सद्यःस्थितीत जागा शिल्लक नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून पदपथ फोडून त्या जागेत अंत्यविधी सुरु आहेत. यामुळे व्यक्तीची मरणोत्तर हेळसांड, विटंबना होत असल्याची तक्रार आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.


राष्ट्रवादीचे पार्थ पवार यांनी टि्विट केले आहे. ते म्हणतात, ”लिंगायत समाजाला जागेअभावी पदपथ फोडून दफनविधी करावा लागत असल्याचे पाहून संताप येतोय. ही विटंबना तत्काळ थांबवा. आपण नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार पुरवू शकत नाही? @pcmcindiagovin लोकसंख्येनुसार दफनविधीसाठी पुरेशी जागा आहे की नाही हे पाहण्याचे काम आपले नाही का असे त्यांनी म्हटले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.