'गुल्हर' मराठी चित्रपटाच्या गाण्याला अजय गोगावलेंच्या आवाजाचा साज

 

Famous-Marathi-singer-Ajay-Gogavale-s-song-Gulhar-from-Marathi-movie

मुंबई: काही गाणी गायकांना शोधत त्यांच्यापर्यंत पोहोचतात, तर काही गायक आपल्या गुणवत्तेमुळं त्या गाण्यापर्यंत पोहोचतात. त्यानंतर दोन्हींचा असा काही मिलाफ होतो की त्यावर प्रेक्षकही खुश होतात. आजवर आपल्या संगीतासोबतच जादुई आवाजानंही संगीतप्रेमींचे कान तृप्त करणारे पार्श्वगायक अजय गोगावले यांच्या आवाजाचा काहीसा नवा ढंग लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 'गुल्हर' या आगामी मराठी चित्रपटासाठी अजयनं एक सुरेख गाणं गायलं असून, हे गाणं संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारं ठरणार आहे. या चित्रपटाने नोएडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये बेस्ट ज्युरी मेन्शन  अॅवॉर्ड, साऊथ इंडियन फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये बेस्ट फिल्म, मराठवाडा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ज्युरी अॅवॉर्ड हे पुरस्कार पटकावले असून बर्लिन लाईफ ऑफ फिल्म फेस्टिव्हल २०२२ मध्ये या चित्रपटाचे ऑफिशियल सिलेक्शन झाले आहे.


शांताराम (आप्पा) मेदगे, शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे आणि अबिद सय्यद यांनी आयडियल व्हेंचर आणि आर. के. फिल्मच्या बॅनरखाली 'गुल्हर' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सहाय्यक दिग्दर्शनाकडून दिग्दर्शनाच्या मैदानात उतरल्यानंतर 'बाबो' या काहीशा वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणाऱ्या रमेश चौधरी यांनी 'गुल्हर'चं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचं 'लहर आली, लहर आली गं...' हे टायटल साँग कथानकात महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. या गाण्याला अजय गोगावले आणि अपूर्वा निषाद यांच्या आवाजाची सुंदर साथ लाभली आहे. गीतकार वैभव कुलकर्णी यांनी हे गाणं लिहिलं असून, संगीतकार पद्मनाथ गायकवाड यांनी त्यावर स्वरसाज चढवला आहे. मुंबईतील यशराज स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॅार्डिंग करण्यात आलं. याबद्दल बोलताना अजय गोगावले म्हणाले की, 'गुल्हर' हे या चित्रपटाचं शीर्षक अनाहुतपणे कोणाचंही लक्ष वेधून घेणारं असून, त्याला साजेसं असलेलं 'लहर आली, लहर आली गं...' हे गाणं संगीतप्रेमींना एक वेगळीच अनुभूती देणारं आहे. या गाण्याच्या निमित्तानं अप्रतिम शब्दरचनांना सुमधूर संगीताची जोड देण्यात आल्याचं माझं मत आहे. गाणं रेकॅार्ड करताना मला एका वेगळाच आनंद आणि आत्मिक समाधान लाभल्यानं हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. प्रेक्षकांनाही हे गाणं ऐकताना याची अनुभूती नक्कीच येईल.


चित्रपटाची कथा मोहन पडवळ यांनी लिहिली असून, पटकथा व संवादलेखन संजय नवगिरे यांनी केलं आहे. या चित्रपटाची वनलाईन खूप सुरेख आहे. पारंपरिक चालीरीतींना मूठमाती देताना त्याविरोधात दंड थोपटत प्राणीमात्रांवर दया करायला शिकवणारी सुंदर कथा 'गुल्हर'मध्ये आहे. एका ११ वर्षांच्या मुलाच्या दृष्टिकोनातून 'गुल्हर'मधील गोष्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. विनायक पोद्दार, रवी काळे, भार्गवी चिरमुले, सुरेश विश्वकर्मा, माधव अभ्यंकर, किशोर चौगुले, रुक्मिणी सुतार, शिवानी बावकर,  शिवाजी भिंताडे, अनुप शिंदे, मंजिरी यशवंत आदी कलाकारांनी या चित्रपटात विविधांगी व्यक्तिरेखा साकारत 'गुल्हर'च्या कथानकाला न्याय दिला आहे. नृत्य दिग्दर्शन विशाल पाटील यांनी केलं असून, कुमार डोंगरे यांनी छायालेखन व संकलन केलं आहे. केदार दिवेकर यांनी पार्श्वसंगीताची बाजू सांभाळली असून, निखिल लांजेकर आणि हिमांशू आंबेकर यांनी साऊंड डिझाईनचं काम पाहिलं आहे. अमर लष्कर हे या चित्रपटाचे प्रोजेक्ट हेड आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.