‘सनातन’ आणि ‘रिलिजन’ या अर्थी वापरला जाणारा ‘धर्म’ या दोन शब्दांचे अर्थ वेगळे


समाज परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे  समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार आहेत. संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीचा समारोप आज पुणे येथे झाला. या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत वैद्य बोलत होते. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख श्री. सुनीलजी आंबेकर हेही या वेळी उपस्थित होते. पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भाषणाने या बैठकीचा समारोप झाला. या बैठकीत विविध ३६ संघटनांचे २६७ प्रतिनिधी उपस्थित होते.


डॉ. वैद्य म्हणाले की, भारतीय जीवनदृष्टीमध्ये कुटुंब हे सर्वात लहान एकक आहे. कुटुंबात स्त्रियांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे राहण्याची भूमिका बजावली पाहिजे. समाजात महिलांची सक्रियता वाढत असून हे निश्चितच प्रशंसनीय आहे. या संदर्भात संघाच्या शताब्दी योजनेअंतर्गत विविध क्षेत्रांत सक्रीय असलेल्या महिलांचा सहभाग वाढवण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. अशा महिलांमधील परस्परसंपर्क वाढवण्यासाठी देशभरात विभाग स्तरावर ४११ महिला संमेलने आयोजित केली जाणार आहेत. आत्तापर्यंत १२ प्रांतांत अशा ७३ संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्याला १  लाख २३ हजारांहून अधिक महिलांच्या सहभागाद्वारे चांगला प्रतिसाद मिळाला.


डॉ. वैद्य म्हणाले की, संघाचे कार्य सुरू होऊन ९७ वर्षे झाली आहेत. या प्रवासाचे चार टप्पे आहेत. संघटना, विस्तार, आणि संपर्क-क्रियाकलाप हे तीन टप्पे होते. २००६ मध्ये  गोळवलकर गुरुजींच्या जन्मशताब्दीनंतर चौथा टप्पा सुरू झाला, ज्यामध्ये प्रत्येक स्वयंसेवकाने राष्ट्राच्या प्रगतीसाठी अधिक सक्रिय होणे अपेक्षित आहे.


बैठकीतील विषयांची माहिती देताना ते म्हणाले की, समाजातील सज्जनशक्तीला संघटित करून सामाजिक कार्यात सक्रिय करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा करण्यात आली.


सनातन संस्कृतीबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, ‘सनातन’ आणि ‘रिलिजन’ या अर्थी वापरला जाणारा ‘धर्म’ या दोन शब्दांचे अर्थ वेगळे आहेत. सनातन सभ्यता ही आध्यात्मिक लोकशाही आहे. सनातनबद्दल विधाने करणाऱ्यांनी आधी या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा.


इंडिया आणि भारत या नावांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, देशाचे नाव ‘भारत’ आहे आणि ते ‘भारत’च राहिले पाहिजे. खरे तर, हे प्राचीन काळापासूनचे प्रचलित नाव आहे आणि त्या नावाला सांस्कृतिक मूल्य आहे.


संघाच्या प्रेरणेने सुरू झालेल्या विविध संघटनांची समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या समन्वय बैठकीमध्ये सहभागी संस्था त्यांच्या कामाची आणि अनुभवांची, तसेच आगामी कार्यक्रमांच्या माहितीची देवाणघेवाण करतात.

 


संघकार्याचा विस्तार

डॉ. वैद्य म्हणाले की, संघाच्या कार्याला देशभरातून मिळणारा प्रतिसाद वाढता आहे. संघाच्या शाखांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि आज ती संख्या कोरोनापूर्वी होती त्यापेक्षा अधिक आहे. २०२० मध्ये देशात ३८ हजार ९१३ स्थानी शाखा होत्या. २०२३ मध्ये ही संख्या ४२ हजार ६१३ झाली आहे, म्हणजेच ९.५ टक्के वाढ झाली आहे. संघाच्या दैनंदिन शाखांची संख्या ६२ हजार ४९१ वरून ६८ हजार ६५१ झाली आहे. देशात संघाच्या एकूण ६८ हजार ६५१ दैनंदिन शाखा असून त्यापैकी विद्यार्थी शाखांचे प्रमाण ६० टक्के आहे. चाळीस वर्षापर्यंतचे तरुण येणाऱ्या शाखांचे प्रमाण ३० टक्के आहे, तर चाळीस वर्षांवरील स्वयंसेवक येणाऱ्या शाखांचे प्रमाण १० टक्के आहे. संघाच्या अधिकृत संकेतस्थळावर दरवर्षी एक ते सव्वा लाख जण संघात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यापैकी बहुतांश २० ते ३५ वयोगटातील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.