त्यावेळी तुझा जन्म पण झाला नव्हता; पुतण्यावर अजित पवारांचा पलटवार

Baramati Loksabha Election Ajit Pawar and Yugendra Pawar

 पुणे: बारामती लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज आपल्या प्रचाराचा नारळ कण्हेरी येथे फोडला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि महायुतीचे असंख्य नेते उपस्थित होते. तर काल याचठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी देखील येथूनच आपल्या प्रचाराला सुरूवात केली. यातच काल सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ युगेंद्र पवार यांनी अजितदादांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आज अजित पवारांनी त्यावर पलटवार केला आहे. 


सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी काल शरद पवारांसह रोहित पवार आणि युगेंंद्र पवार यांनी देखील भाषणं केलीत. यावेळी गेल्या काही वर्षात बारामतीतील सर्व संस्था या शरद पवारांमुळेच काढल्या असा दावा युगेंद्र पवार यांनी केला. त्यावर ती (रोहित पवारांसह इतर भावकीतील मुलं) माझीही मुलं आहेत. शरद पवारांनी मला खासदार केल्यावर एकाचा जन्म झाला. आणि काल तो सांगतो की साहेबांनी सर्व संस्था काढल्या. केलं मग? ३१-३२ वर्षे मी नुसताच शांत बसलो. मी काहीच केलं नाही. बारामती जी काही सुधारली ती इतरांमुळे सुधारली. अजितचा काडीचा संबंध नाही?” असा सवालही त्यांनी यानिमित्ताने केला. 


युगेंद्र पवारांनी केलेल्या वक्तव्याचा अजित पवारांनी चांगलाच समाचार घेतला. यावेळी काही संस्थांची यादीच अजित पवारांनी वाचून दाखवली. त्यावर ते म्हणाले की, बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कोणी आणला? जाचकबंधूंनी आणला. माळेगाव सहकारी साखर कारखाना शेंबेकर, जाधवरावांनी आणला. सोमेश्वर कारखाना मुकुटराव आप्पांनी आणला. हे सर्व जगजाहीर आहे. खरेदी विक्री संघ पूर्वीच होता, आपल्या काळात नाही निघाला. त्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती. मार्केट कमिटी कधीची आहे, फार पूर्वीपासूनची आहे. नगरपालिका १८६५ मधली आहे. तुमचा आमचाही जन्म झाला नव्हता. पण ते म्हणतात संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता. काय डोकं चालतंय? असा खोचक सवालही अजित पवार यांनी केला. 


दरम्यान, गावकी-भावकीची ही निवडणूक नाही तर देशाची निवडणूक आहे. देशाच्या १३५ कोटी जनतेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवणारी ही निवडणूक आहे. ही निवडणूक सासू-सुनेची, नणंद भावजयीची निवडणूक नाही. ही निवडणुक भावकीची निवडणूक नाही ही मोदी साहेब आणि राहुल गांधींची निवडणूक आहे. माझ्यावर वेगवेगळे आरोप केले जातात. पण त्यांच्या आरोपामुळे मला काय भोकं पडत नाही. बारामतीची जनता मला अनेक वर्षे ओळखते. माझं लहाणपण येथेचं गेलंय. बारामतीतील सर्व  स्थित्यंतराचे बारामतीतील वडिलधारी लोक साक्षीदार आहेत. असेही ते म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.