"वंचित घटकांना एकत्र आणणे, त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक",सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे

Opinion-of-Vishal-Londhe-Assistant-Commissioner-of-Social-Justice-Department


पुणे : मागासवर्गीय, बहुजन समाजामध्ये आज काही प्रमाणात आर्थिक सक्षमता आली आहे,  त्याचे कारण शिक्षण, नोकऱ्यातील प्रमाण हे आहे. परंतु आजही या समाजातील बहुतांश लोकांचा सामाजिक स्तर उंचावलेला नाही. सामाजिक न्याय विभाग या लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांना रोजगाराच्या संधी, स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी सातत्याने मदत करत आहे. आज ज्या लोकांचे सामाजिक जीवन उंचावले आहे त्यांनीही पुढे येऊन समाजातील वंचित घटकाला, लोकांना एकत्र आणणे आणि त्यांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी व्यक्त केले. 


पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे येथे बहुजन हिताय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे, ची 17 वी  वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी 'बहुजन समाजाचे आर्थिक सक्ष्मीकारण' या विषयावर मार्गदर्शन करताना लोंढे बोलत होते.  यावेळी पतसंस्थेचे सचिव विलास वनाशिव, विश्वस्त रवींद्र दुधेकर, उपाध्यक्ष वसंत साळवी, संचालक राजेंद्र डोळस, जयश्री वाघमारे, अनिल सूर्यवंशी, व्यवस्थापक संतोष मेश्राम, दिपक म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते. 


पुढे बोलताना विशाल लोंढे म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेला बहुजन समाजातील हा वर्ग सामाजिक स्तर उंचावलेला आहे. आपण राबवत असलेले सामाजिक उपक्रम अतिशय चांगले आहेत, परंतु आपल्या कामाची माहिती वस्ती, झोपडपट्टी भागात नाही याचे कारण काय आहे? याचा विचार करणे गरजेचे आहे, कारण आज तुम्ही मोठे झाले आता आपल्याला समूहाला मोठे करण्याची गरज आहे. सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना आहेत मात्र त्या गरजू लोकांपर्यंत अजूनही पोहचल्या नाही. कारण जनजागृतीचा अभाव किंवा युवकांना काही ठराविक गोष्टी पलीकडे जाणून घेण्यात रस नसल्याचे दिसते.  तसेच लोंढे यांनी एका संस्थे मार्फत वैयक्तिक पातळीवर केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणाऱ्या 40 मुलांना दत्तक घेतल्याचेही सांगितले. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सभेच्या इतिवृत्ताचे  वाचन विलास वनाशिव यांनी केले, तसेच संस्थेचे संचालक, विश्वस्त यांनी विविध ठराव पारित केले आणि अंदाजपत्रक मांडले. दारम्यान 2023 - 24 साठी सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. याप्रसंगी ठेवीदार, कर्जदार यांच्यासह सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.