खडकवासला मतदार संघात पंकजा पंकजा मुंडेंची आढावा बैठक, जागा वाटपाबाबत मोठं विधान

Pankaja-Munde-Khadakwasla-Assembly-Constituency-Meeting-Bhimrao-tapkir


पुणे: आगामी खडकवासला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली तयारी सुरु केली आहे. याच अनुषंगाने खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक भाजपा राष्ट्रीय सचिव आणि आमदार पंकजा मुंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात पार पडली. या बैठकीस खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह मतदारसंघातील भाजपचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मात्र भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांची अनुपस्थिती होती.


बैठकीत पंकजा मुंडे यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करत पक्षाची निवडणुकीसाठीची दिशा स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, "भाजप कार्यकर्ता हा निष्ठावान, मेहनती आणि पक्षाशी एकनिष्ठ आहे, याचमुळे भाजपचा विजय निश्चित होतो. आगामी निवडणुकीत भाजपचे सरकार पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे कामाला लागावे आणि विजयाचे शिल्पकार व्हावे." 



या बैठकीत आमदार भीमराव तापकीर यांनी उमेदवारीसाठी होणाऱ्या वादांबद्दल खंत व्यक्त केली. त्यांनी कार्यकर्त्यांना सुनावले की, "उमेदवारी मागताना माझी बदनामी करू नका. लोकशाहीत सर्वांना तिकीट मागण्याचा अधिकार आहे, मात्र तिकीट मागताना चांगल्या पद्धतीने चर्चा करावी." त्यांनी स्पष्ट केले की, आपली रेष मोठी करण्यासाठी दुसऱ्याची रेष कमी करण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे पक्षातील अंतर्गत नाराजी चर्चेत आली आहे. 


तसेच नऱ्हे गावाच्या सरपंचांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. त्यांनी पक्षावर निवडणुका जाणून-बुजून पुढे ढकलत असल्याचा आरोप केला, आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निवडणुका टाळण्यासाठी वापरल्याचं सांगितलं. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांवरही नाराजी व्यक्त करत, "निवडणुका घ्या" अशी मागणी त्यांनी पंकजा मुंडे यांच्यासमोर केली. 


या बैठकीनंतर पंकजा मुडेंनी सांगितले की, जागा वाटपाबाबत काही जागा ठेवल्या जातील बाकी जागांचा निर्णय होईल. महायुतीचं जागा वाटप प्रमुख नेते ठरवतील. दिल्लीतील काही नेते सर्वेक्षण झाल्यानंतर याचा निर्णय घेतील, काही जागा वेगळ्या कारणासाठी ठेवल्या जातील. तसेच, जागा वाटपाबाबत बोलताना हा अडचणीचा विषय नसून चर्चेचा विषय आहे. थोडा वेळ या सर्व गोष्टींसाठी द्यावा लागेल. असं बोलत त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आपली प्रतिकिया दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.