पुणे: कोथरूड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज सकाळी तात्यासाहेब थोरात उद्यानात जाऊन मॉर्निंग वॉकला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक मतदारांशी साधलेल्या या संवादामुळे चंद्रकांतदादा पाटील यांना प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे दिसून आले. "दादा आमच्या लक्षात आहे… तुम्ही फक्त विजयाचे पेढे घेऊन या!" अशी नागरिकांनी दिलेली उत्स्फूर्त प्रतिक्रिया त्यांच्या विजयाची खात्री दर्शवित होती. यावेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील आपल्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
चंद्रकांतदादा पाटील यांना भेटण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाने त्यांचे स्वागत केले. नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल असलेला विश्वास आणि समर्थन पाहता अनेकांनी त्यांना पुन्हा मंत्रीपदावर पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली. "तुम्ही कोथरूडच्या घराघरात पोहोचले आहात, कोथरूडकरांचा एकच वादा - चंद्रकांतदादा" अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या. त्यावेळी दादांनी नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानत, त्यांच्यासोबत निवडणूक जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.
या भेटीत चंद्रकांतदादांसोबत भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, नगरसेविका ॲड. वासंती जाधव, हर्षाली माथवड, भाजपा नेते नवनाथ जाधव, गिरीश भेलके, बाळासाहेब टेमकर, अजित जगताप, दिपक पवार तसेच इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक नेत्यांनीही चंद्रकांतदादा पाटील यांना पाठींबा देत त्यांचे यश सुनिश्चित करण्याची ग्वाही दिली.
नागरिकांना भेटल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क नक्की बजावण्याचे आवाहन केले. "मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे, त्यासाठी प्रत्येकाने मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग घ्यावा," असे ते म्हणाले. यासोबतच, अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा, अशी त्यांनी विनंती केली.
चंद्रकांतदादा पाटील यांच्या या संवाद दौऱ्यामुळे कोथरूड मतदारसंघात त्यांना मिळणाऱ्या समर्थनाची ठामता दिसून येत आहे. निवडणूक लढतीत नागरिकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद पाहून त्यांच्या विजयाची आशा अधिकच दृढ झाली आहे.