पुणे: विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यातील सर्वच मतदारसंघापैकी मावळची चर्चा अधिक असते. कारण येथील राजकीय गणित इतर मतदारसंघापैकी फार वेगळी राहिली आहेत. अशातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटात बंडखोरी करणारे बापू भेगडे यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. अजित पवार गटाने सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्याने बापू भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केल्याने त्यांच्यावर पक्षाने निलंबणाची कारवाई केली आहे.
महायुतीत मावळमधून विद्यमान आमदार सुनील शेळके यांना आपली उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला. बापु भेगडे हे अजित पवार गटात प्रदेश उपाध्यक्ष पदावर होते. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. महायुतीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात नामांकन पत्र भरून पक्षविरोधी भूमिका घेतल्याने तसेच महायुती सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे कृत्य जाणीवपुर्वक करून पक्षशिस्तभंग केला असल्यामुळे सदर पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून निलंबित करण्यात येत आहे. असे पत्रात म्हटले आहे.
बापू भेगडे यांच्यासह अकोला ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे, नांदेड उत्तरचे जिल्ह्याध्यक्ष विश्वंभर पवार, नांदेड महिला जिल्हाध्यक्षा पुजाताई व्यवहारे, धुळ्याचे ज्ञानेश्वर भामरे, भंडारा तुमसर तालुका अध्यक्ष धनेंद्र तुरकर, नांदेड युवक प्रदेश सचिव आनंद सिंधीकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी देखील विरोधी भूमिका घेतली आहे. परंतु संपुर्ण भाजप सुनील शेळके यांच्यासोबत उभा राहिल असे ठामपणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्यांच्या आदेशानुसार मावळात संपुर्ण भाजपचे कार्यकर्ते आता कामाला लागले आहेत. त्यामुळे येत्या २३ तारखेला मावळातून कोण गुलाल उधळणार ते पाहणं महत्वाचे ठरणार आहे.