पुणे: पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वक्तशीरता सर्वश्रुत आहे. पण याच वक्तशीरतेचा अतिरेक गुरुवारी पुण्यातील एका उद्घाटन कार्यक्रमात दिसून आला. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन अजित पवार यांनी नियोजित वेळेच्या दहा मिनिटे आधीच उरकले. त्यामुळे भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी नाराज झाल्या आणि त्यांना जाहीरपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी लागली.
कार्यक्रमाची वेळ सकाळी ६:३० अशी ठरवली होती. मेधा कुलकर्णी नियोजित वेळेच्या काही मिनिटे आधीच कार्यक्रमस्थळी पोहोचल्या, पण तेव्हाच त्यांना समजले की अजित पवारांनी उद्घाटन आधीच पार पाडले आहे. त्यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले, "मी विषय वाढवणार नव्हते, पण पत्रकार विचारायला आले, म्हणून सांगते. बस किंवा फ्लाईट आपण पकडायला गेलो आणि ती आधीच निघून गेली, तर वाईट वाटतं. दादा यांनी वेळेच्या १० मिनिटं आधी उद्घाटन केलं. आम्हालाही पहाटे उठायची सवय आहे, पण प्रोटोकॉलनुसार जे आमंत्रित असतात ते वेळेवर येतातच." यावर परिस्थिती अधिक तणावपूर्ण न होता, खुद्द अजित पवार यांनी पुढाकार घेत पुन्हा एकदा मेधा कुलकर्णी यांच्यासमवेत उद्घाटन करून कार्यक्रमाचे औपचारिकता पूर्ण केली.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना कुलकर्णी म्हणाल्या,
"मी पुण्यातली एकमेव ब्राह्मण खासदार आहे. परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी मी नक्कीच काम करणार आहे. फक्त एवढीच विनंती आहे की वेळ एकदा ठरली, की ती पाळली जावी. दादा काम उत्तम करतात, आमच्यासाठी ते आदर्श आहेत. पण वेळेपूर्वी उद्घाटन नको."
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे कार्यक्रमानंतर चर्चेला उधाण आलं. काहींनी याकडे केवळ समन्वयाचा अभाव म्हणून पाहिलं, तर काहींनी याला सूचक राजकीय संदेश मानला. एकूणच, ‘घाईच्या उद्घाटनाने’ राजकीय रंग भरले आणि त्यातून पुन्हा एकदा संयम, सुसंवाद आणि प्रोटोकॉल यांच्या गरजेची जाणीव झाली.