पुणे: रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाऊंडेशनच्या वतीने उपाध्यक्षा शोभाताई आर. धारीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त एक अभिनव आणि समाजोपयोगी कार्यक्रम पुण्यातील एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आले. या दिवशी मोफत नेत्र तपासणी शिबिर, ५०१ मोतीबिंदू रुग्णांची तपासणी आणि शस्त्रक्रिया, वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप, रक्तदान शिबीर तसेच वृक्षारोपण उपक्रम असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. कोंढवा येथील आर एम डी इंग्रजी शाळा, तसेच लोणीधामणी, कासारी, नवलेवाडी आणि पिंपरी पेंढार या गावांमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
समाजसेवेचे व्यापक कार्य - जान्हवी धारीवाल बालन यांचे भाष्य
या कार्यक्रमात बोलताना जान्हवी धारीवाल बालन यांनी फाऊंडेशनचे संस्थापक स्व. श्री रसिकलाल माणिकचंद धारीवाल यांच्या दूरदृष्टीपूर्ण विचारांची आठवण करून दिली. त्यांनी सांगितले की, “गुजरातमधील मोफत कॅन्सर हॉस्पिटल, ससून रुग्णालयात अपघात कक्ष, नाशिक येथील आर एम डी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पूना हॉस्पिटलमध्ये कार्डियाक युनिट या आरोग्य प्रकल्पांची उभारणी, शिक्षण क्षेत्रात फार्मसी, अभियांत्रिकी, व्यवस्थापन महाविद्यालये, इंग्रजी शाळा आणि दरवर्षी गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी खडकवासला धरणातून गाळ काढणे, बंधारे बांधणे या अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये फाऊंडेशन कार्यरत आहे.” तसेच या सर्व प्रकल्पांच्या यशामध्ये शोभाताई आर. धारीवाल यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. मोतीबिंदू रुग्णांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
पुनीत बालन यांचे सामाजिक भान
बालन ग्रुपचे अध्यक्ष श्री. पुनीत बालन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “समाजाचे ऋण फेडणे ही प्रत्येक उद्योजकाची जबाबदारी आहे. कमाईतील काही भाग समाजासाठी वापरणे हे आमचे कर्तव्य आहे. शोभाताई यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हीही या कार्यात सहभाग नोंदविला आहे, आणि पुढेही देऊ.”
कार्यक्रमाच्या शेवटी फाऊंडेशनच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयाला धनादेश सुपूर्द करण्यात आला. यासोबतच शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचे धनादेश वितरित करण्यात आले. रक्तदान शिबिरात सहभाग घेतलेल्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमामुळे सामाजिक उत्तरदायित्वाची एक प्रभावी प्रचिती सर्व उपस्थितांना अनुभवायला मिळाली. या कार्यक्रमाला शोभाताई आर. धारीवाल (उपाध्यक्षा), जान्हवी धारीवाल बालन (अध्यक्ष - आर एम डी फाऊंडेशन), नितीनभाई देसाई (विश्वस्त - एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल), परवेझ बिलिमोरिया (कार्यकारी संचालक), इंद्राणी बालन फाऊंडेशन व बालन ग्रुपचे अध्यक्ष श्री. पुनीत बालन, रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, शिकावू विद्यार्थी आणि विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.