पुणे : (प्रतिनिधी) हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ख्याती मिळवलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक यंदाही दिमाखदार आणि भक्तिभावात पार पडली. रत्नजडीत ‘श्री गणेशरत्न रथ’, त्यावरील पिंक वेलवेट फुलांची झगमगती सजावट, विद्युत रोषणाई, कोल्ड फायरची आतषबाजी, भंडाऱ्याची उधळण, पुष्पवृष्टी, ढोल-ताशांचा गजर आणि “मोरया मोरया”च्या जयघोषात भाविकांच्या हजारो साक्षीने बाप्पाला निरोप देण्यात आला.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९२ मध्ये पुण्यात झाली आणि या ऐतिहासिक चळवळीचे जनक म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचे नाव घेतले जाते. त्या काळात इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध समाजाला एकत्र आणण्याची गरज होती. लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला राजकीय आणि सामाजिक उर्जा दिली, परंतु पहिल्या सार्वजनिक गणेशमूर्तीची स्थापना ही भाऊसाहेब रंगारी यांच्या पुढाकाराने झाली. यामुळे या गणपतीला “हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती” अशी मानाची उपाधी लाभली आहे. १३४ वर्षांचा हा परंपरेचा वारसा आजही पुणेकर मोठ्या श्रद्धा आणि अभिमानाने जोपासतात.
विसर्जन मिरवणुकीची वैशिष्ट्ये
अनंत चतुर्दशीला शनिवारी सकाळी साडेसातला पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या हस्ते बाप्पाची पूजा-आरती झाली. सकाळी आठ वाजता ‘श्री गणेशरत्न रथ’ रत्नमहालातून मंडईतील टिळक पुतळ्याकडे मार्गस्थ झाला. टिळक पुतळा येथे परंपरेनुसार ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांनी मानाच्या पाच गणपतींना पुष्पहार अर्पण केले.
रात्री साडेदहाच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. श्रीराम व रमणबाग ढोल पथकांच्या तालावर वातावरण दुमदुमले. बेलबाग चौकात रथाचे आगमन होताच “मोरया मोरया”च्या गजरात भाविकांनी बाप्पाचे स्वागत केले. मार्गभर ठिकठिकाणी भंडाऱ्याची उधळण, पुष्पवृष्टी आणि रथावरून होणारी विद्युत आतषबाजी यामुळे वातावरणात उत्साहाची लहर उसळली.
पहाटे सव्वा तीनच्या सुमारास ‘श्री गणेशरत्न रथ’ टिळक चौकात पोहोचला. सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या उपस्थितीत बाप्पाची आरती झाली. अखेरीस पहाटे ३.५० वाजता पांचाळेश्वर घाटावर महापालिकेच्या हौदात बाप्पाचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.
रथाची सजावट : भाविकांसाठी आकर्षण
गत १३४ वर्षांपासून भाऊसाहेब रंगारी गणपतीची विसर्जन मिरवणूक पारंपरिक रथातून होत होती. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून ट्रस्ट दरवर्षी नवा रथ सजवतो. यंदा रत्नजडीत ‘श्री गणेशरत्न रथ’ भाविकांचे लक्ष वेधून घेत होता. पिंक वेलवेट फुलांची सजावट, त्यावर विद्युत रोषणाई आणि देखणी गणेशमूर्ती या रथाचे विशेष आकर्षण ठरले. हजारो भाविकांनी रथाचे दर्शन मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.