पुणे: महाराष्ट्रात दणक्यात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य उत्सव’चा दर्जा देण्याची ऐतिहासिक घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. ही घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. विशेष म्हणजे ही मागणी पुण्याचे आमदार हेमंत रासने यांनी विधिमंडळात जोरकसपणे मांडली होती, आणि त्यांच्या पाठपुराव्याला तातडीने यश आले.
हेमंत रासने यांनी विधिमंडळात बोलताना सांगितले की, "लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९३ साली सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवामुळे समाजप्रबोधन, एकात्मता, आणि संस्कृती संवर्धनाला चालना मिळाली. पुण्यासारख्या शहरात गणेशोत्सव हे केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक चळवळ ठरली आहे. त्यामुळे या उत्सवाला ‘राज्य उत्सव’ म्हणून घोषित करणे ही काळाची गरज आहे."त्यांनी असेही सुचवले की, पुण्यात सादर होणाऱ्या देखावे, उपक्रम, आणि प्रबोधनात्मक प्रयोग हे २४ तास चालू ठेवण्यासाठी विशेष परवानगी मिळावी, तसेच नगर रचना, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सार्वजनिक शौचालये आदीसाठी शासनाने ठोस आर्थिक तरतूद करावी.
रासने यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले, "गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या हृदयात वसलेला उत्सव आहे. त्यामुळे या उत्सवाला 'राज्य उत्सव' घोषित करून, शासनाकडून आवश्यक त्या सर्व सुविधा आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल." ते पुढे म्हणाले की,
"गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी लागणाऱ्या खर्चावर कोणतीही मर्यादा लादली जाणार नाही. गरज भासल्यास १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी सुद्धा उपलब्ध केला जाईल. मंडळांवरील अनावश्यक निर्बंधही शिथिल करण्याचा प्रयत्न केला जाईल."
लोकमान्य टिळकांनी 1893 साली सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने धार्मिक, सांस्कृतिक परंपरा जपत समाज प्रबोधनाची भूमिका बजावली आहे. हा उत्सव महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य उत्सव’ म्हणून मान्यता दिल्याबद्दल राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे, मा.श्री. अजितदादा पवार तसेच महायुती सरकारमधील सर्व मंत्रीमंडळाचे मनःपूर्वक आभार. - आमदार हेमंत रासने, कसाबा विधानसभा