"भक्ती की बिनधास्ती? डीजेमुक्त उत्सवासाठी पुनीत बालन यांचा 'नवा पवित्रा'"

 

Puneet-Balan-s-initiative-for-DJ-free-Ganeshotsav-does-not-help-Ganesh-Mandals-that-have-DJs

पुणे: पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी एक सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक प्रेरणास्थान मानला जातो. या उत्सवाला मिळणारे वैभव आणि प्रतिष्ठा ही केवळ देखाव्यामुळे नसून, या मागे असलेल्या परंपरा, मूल्यं आणि लोकसहभागामुळे आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डीजे संस्कृतीमुळे या उत्सवाच्या सत्त्वाला गालबोट लागल्याच्या पार्श्वभूमीवर, 'पुनीत बालन ग्रुप'चे प्रमुख पुनीत बालन यांनी एक धाडसी आणि दूरगामी निर्णय घेतला आहे.


पुनीत बालन यांनी जाहीरपणे सांगितले की, "जे गणेश मंडळ डीजेवर अश्लील गाणी वाजवतात, ध्वनीप्रदूषण करतात आणि धार्मिकतेच्या नावावर केवळ करमणुकीचा बाजार मांडतात, त्यांना 'पुनीत बालन ग्रुप'कडून यापुढे कोणत्याही स्वरूपात आर्थिक मदत अथवा जाहिरात देण्यात येणार नाही." हा निर्णय त्यांनी ‘समर्थ प्रतिष्ठान’च्या ढोल-ताशा पथकाच्या वाद्यपूजन कार्यक्रमात जाहीर केला. या वेळी खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बालन यांनी आपल्या भाषणात गणेशोत्सवाचा इतिहास उलगडताना सांगितले की – "लोकमान्य टिळक आणि भाऊसाहेब रंगारी यांनी सामाजिक एकोपा, ब्रिटिशांविरोधात जनजागृती आणि हिंदू समाजाला संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना मांडली. त्या काळात हा उत्सव विचारांची देवाणघेवाण, कलावंतांना व्यासपीठ आणि सामाजिक संवादाचे माध्यम होते." आज मात्र काही मंडळांनी याचे विकृतीकरण करून बेसुमार आवाज, धांगडधिंगा, अश्लील गाणी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आकर्षित करणारा कार्यक्रम बनवला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.


पुनीत बालन यांचा दृष्टिकोन केवळ विरोध करण्यापुरता मर्यादित नाही. त्यांनी पर्यायी मार्गही सुचवले. त्यांनी सांगितले की, "ढोल-ताशा पथके, भजन-मंडळ्या, लेझीम, नृत्यनाटिका, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर आधारित झांक्यांद्वारेही गणेशोत्सव साजरा करता येतो. लोकसहभागातून, शिस्तबद्धतेतून आणि भक्तीभावाने उत्सव साजरा करणे, हाच खरा उद्देश आहे." 


त्यांनी सांगितले की, ‘माणिकचंद ऑक्सिरीच’ आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ यांच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो मंडळांना जाहिरात स्वरूपात मदत केली जाते. मात्र यावर्षीपासून ती मदत केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक मूल्यांशी सुसंगत मंडळांनाच मिळेल. 


समाजातून व्यापक पाठिंबा

बालन यांच्या या निर्णयाचे समाजाच्या विविध स्तरांतून जोरदार स्वागत झाले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळं, शाळा, महाविद्यालये आणि संस्कृतीविषयक संस्था यांचा प्रतिसाद मिळत आहे. यात उल्लेखनीय म्हणजे, काही तरुण मंडळांनी देखील 'डीजेमुक्त उत्सव' उपक्रमात सहभाग घेण्याची तयारी दर्शवली आहे.


शहरात डीजेच्या दणदणाटामुळे उद्भवणाऱ्या समस्या :

ध्वनीप्रदूषण : लहान मुले, वृद्ध, रुग्ण यांना त्रास

वाहतूक कोंडी : स्पीकर व डीजे सेटअपमुळे रस्त्यांवर अडथळे

अश्लीलता व असंस्कृत गाणी : सामाजिक वातावरण बिघडते

गुन्हेगारी प्रवृत्तींची वाढ : काही ठिकाणी वाद, हाणामाऱ्या

खऱ्या कलाकारांना वंचित ठेवणे : ढोल, ताशा, भजन, वादनाला बाजूला सारले जाते


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.