पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; मराठी-हिंदी झगड्यात, नव्या वादाची शक्यता

 

Deputy-Chief-Minister-Eknath-Shinde-in-a-controversy-after-raising-the-slogan-Jai-Gujarat

पुणे : राजकीय वातावरण आधीच मराठी विरुद्ध हिंदी वादामुळे तापले असताना, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात 'जय गुजरात'चा नारा दिल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात शिंदे यांनी 'जय महाराष्ट्र'नंतर 'जय गुजरात'चा नारा दिला. यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाला घालण्याचा आरोप विरोधकांकडून होण्याची शक्यता आहे.


शिंदे हे आज पुण्यातील कोंढवा येथे उभारण्यात आलेल्या ‘जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटर’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी त्यांनी "धन्यवाद, जय महाराष्ट्र" असे म्हणत माईक बाजूला ठेवला. मात्र क्षणभरात त्यांनी खाली पाहून पुन्हा "जय गुजरात" असा नारा दिला. यामुळे कार्यक्रमात काही क्षणासाठी आश्चर्यचकित वातावरण निर्माण झाले. उपस्थित गुजराती बांधवांनी मात्र या घोषणेला टाळ्यांचा प्रतिसाद दिला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका घोषणेमुळे कार्यक्रमाचं स्वरूपच बदलून गेलं आहे. 'जय महाराष्ट्र'नंतर 'जय गुजरात'चा नारा हे केवळ एक सहज उत्स्फूर्त उद्गार होते की त्यामागे एखादा ठाम राजकीय संकेत होता, यावर आता चर्चेचा धुराळा उडाला आहे. भाषणानंतरची ही एक ओळ, राजकीय वर्तुळात मोठा ऐका झालेला ‘सिग्नल’ मानली जात आहे. आगामी काळात याचे पडसाद किती दूर जातात आणि कोणत्या दिशेने वळतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हे केंद्र गुजराती समाजाच्या वतीने उभारण्यात आले असल्याने, त्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हा नारा दिला असावा, असा समज काही ठिकाणी व्यक्त होत आहे. मात्र राज्याचे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाही 'जय महाराष्ट्र'च्या जोडीने 'जय गुजरात'चा नारा देणे — तेही पुण्यासारख्या मराठी अस्मितेच्या शहरात — हे काहींच्या दृष्टीने वादास आमंत्रण ठरणार आहे.


याच कार्यक्रमात शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे स्तुतिसुमने उधळत, एक शेर सादर केला:

"आपके बुलंद इरादोंसे तो चट्टाने भी डगमगाती है,

दुश्मन क्या चीज है, तुफान भी अपना रुख बदल देता है,

आपके आने से यहाँ की हवा का रुख बदल जाता है,

आपके आनेसे हर शख्स आदब से झुक जाता है"


या शेरच्या माध्यमातून शिंदे यांनी अमित शाह यांच्याविषयी आपली निष्ठा आणि राजकीय जवळीक अधोरेखित केली. मात्र हे विधानही राजकीय चर्चेचा विषय ठरू शकते, कारण महाराष्ट्रात 'मराठी स्वाभिमान' आणि 'स्थानिक अस्मिता' हे विषय सतत संवेदनशील राहिलेले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.