छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील - अजित पवार

Sinhagad Times छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील - अजित पवार
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचं राज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायानं राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचं द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेलं शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण केले आहे.

कोरोनामुळे अनेक सणसोहळ्यांवर विरजण पडलं असून यंदा शिवराज्याभिषेक दिन मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थित साजरा केला जाणार होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांच्यासारखा महामानव एकदाच जन्म घेतो आणि अखिल मानवजातीचे कल्याण करुन जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जीवनात केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जागवली. महाराष्ट्राच्या दर्‍याखोर्‍यातल्या मावळ्यांना, अठरापगड जातींना एकत्र करुन त्यांच्या मनात, स्वाभिमानाचं, स्वराज्याचं बीज रुजवलं.

महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला आपले वाटेल, जिथं सर्वांना न्याय मिळेल असं स्वराज्य निर्माण केले. शेतकर्‍यांना न्याय दिला. कष्टकर्‍यांना स्वाभिमान दिला. शिवराज्याभिषेकानं महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. त्यांच्यासारखा राजा मिळाला म्हणूनच शिवराज्याभिषेक दिनाचं आपल्या जीवनात सर्वाधिक महत्वं आहे. अशा शब्दात पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर व्यक्त करीत राज्यातील जनतेला शिवराज्याभिषेकाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.