चक्रीवादळात घरावरून पडून हात फ्रॕक्चर
विशाल भालेरावसिंहगड टाईम्स- दि. ९ निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका वेल्हे तालुक्याला बसला असून या वादळी वाऱ्यात सुदैवाने वेल्हे तालुक्यात जीवितहानी झाली नसली तरी अनेकांचे डोक्यावरील छत व जगण्याचा आधारच हिरावले गेले आहे. या वादळात विंझर (ता. वेल्हे) येथील शंकर कोंडीबा मळेकर (वय ६७) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय मदतीची गरज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चक्रीवादळ सुरू झाले तेव्हा दुपारी दीडच्या सुमारास शंकर मळेकर घरातच होते. वादळाचा जोर हळूहळू वाढत असताना घरावरचे पत्रे जास्तच वाजू लागले होते. पत्रे उडून जाण्याच्या भीतीने शंकर मळेकर हे घराच्या छतावर वजन ठेवण्यासाठी गेले असता वादळाचा जोर आणखी वाढल्याने घरावरून खाली पडले. या अपघातात त्यांच्या उजव्या मनगटाला व डाव्या खांद्याला जबर मार लागला असून दोन्ही ठिकाणी हाड फ्रॕक्चर झाले आहे.
ही घटना घडताच वादळी वाऱ्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात नेणे शक्य झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या दरम्यान पुणे येथील नवले हॉस्पिटलमध्ये शंकर मळेकर यांना दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुढील दोन दिवसात मनगटाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. एकाच वेळी दोन शस्त्रक्रिया करता येणार नसल्याने खांद्याची शस्त्रक्रिया नंतर केली जाणार असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले.
यावेळी वेल्हे तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष सुनील जागडे म्हणाले, शंकर मळेकर यांची कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असून प्रशासनाने शासकीय नियमानुसार लाभ मिळवून देऊन वैद्यकीय खर्चासाठी मदतीचा हात द्यावा.