या वर्षी वटपौर्णिमा वडाचे रोपटे लावून साजरी करूया - पुजा पारगे
सिंहगड: (Sinhagad Times) Vat Pornima हिंदू धर्मात सगळे सण हे हिंदू नववर्षाप्रमाणेच साजरे केले जातात. त्यामुळे भारतात जवळपास सगळेच छोटे-मोठे सण हे अतिशय जल्लोषात साजरे केले जातात. हिंदू धर्मातील महिला या आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वर्षातून एकदा उपवास करते. तो उपवास म्हणजे वटपौर्णिमेचा. या दिवशी सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले असल्याची अख्यायिका आपल्याकडे प्रचलित आहे. त्यामुळे वटपौर्णिमेला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्त्व आहे.या वर्षी ५जून रोजी वटपौर्णिमा आहे. परंतु कोरोना विषाणू संसर्गामुळे लाॅकडाऊन कालावधी चालू असल्याने एकत्र वडाची पुजा करायला सुध्दा जाता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये महिलांनी या वेळी वटपौर्णिमाचे औचित्य साधून एक वडाचे झाड लावावे व याचवेळी पूजा करताना ईश्वराकडे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करावी असे आवाहन पुजा नवनाथ पारगे सभापती महिला व बालकल्याण जिल्हा परिषद पुणे यांनी केले आहे.
या वर्षी करोनाच्या प्रादुर्भावामुळे वटपौर्णिमा साजरी करता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये माझ्या मनात एक कल्पना सुचली. आपण मनोभावे वडाचे दरवर्षी पुजन करतोच त्यापेक्षा यावर्षी आपण वटपौर्णिमा याचे औचित्य साधून एक वडाचे झाड लावायचे. व तीच एक आठवण म्हणून जपायचे. त्यासाठी वडाचे झाड नाही. मिळाले तरी चालेल त्याऐवजी जे झाडाचे रोप मिळेल ते लावून ते जपायचे. वडाचे झाड सर्वाधिक ऑक्सिजन देते, परंतु ईतर झाडे सुध्दा फळे, फुले, सावली देतातच ना. पर्यावरण दिनी म्हणण्यापेक्षा वटसावित्रीच्या दिनी अधिकाधिक रोपे लावून त्यांचे संगोपन करूयात हाच वटसावित्रीचा वसा जपुयात माझ्या सर्व भगिनींना विनंती आहे की, आपण सर्वांनी वडाचे झाड किंवा जे उपलब्ध झाडाचे रोप मिळेल ते आपल्या शेतात/ घराजवळ लावूया. झाड लावल्यानंतर त्या झाडा सोबत आपला सेल्फी काढा व मला पाठवा. हीच आठवण म्हणून आपली वटसावित्रीचा सण साजरा करूया. पुजा नवनाथ पारगे, सभापती - महिला व बालकल्याण पुणे जिल्हा परिषद
वडाच्या झाडाचे महत्व
वटवृक्ष हे दीर्घायुष्य व चिरंजीवित्वचे प्रतीक मानले जाते. स्त्री आरोग्याच्या दृष्टीने वट वृक्ष हा फार महत्वाचा आहे. अनेक पक्ष्यांचे वट वृक्ष हे आश्रयस्थान आहे. पर्यावरण दृष्टीने वडाचे महत्व खूप आहे. उद्या वटपौर्णिमा अन जागतिक पर्यावरण दिन आहे. किमान एक वडाचे रोप लावून त्याचे संवर्धन करावे. आपण स्वतः संवर्धन केलेल्या झाडाची पूजा करण्याचे पुण्य घ्यावे.वट सावित्री कथा
भद्र देशाचा नरेश अश्वपती ह्याची कन्या म्हणजे सावित्री. उपवर झालेल्या सावित्रीला तिच्या पित्याने स्वतः साठी इच्छित वर निवडण्यास सांगितले. सावित्रीने सत्यवान ह्या गुणी राजपुत्रांची निवड केली. शत्रू कडून पराजय झाल्याने ते वनात राहत असत. नारदांनी सत्यवानाचे आयुष्य फक्त एकच वर्ष आहे हे सांगूनही सावित्रीने आई वडील देवगुरु ह्यांचा विरोध पत्करून सत्यवानाशी विवाह केला. वनात जाऊन वृद्ध सासू सासरे तसेच पतीची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू तीन दिवसांवर आला असताना सावित्री सावली सारखी सत्यवानाच्या बरोबर राहिली. जंगलात लाकडे तोडत असताना सत्यवान घेरी येऊन खाली पडला व यम देवाने त्याचे प्राण काढून घेऊन यम लोकाकडे जाऊ लागला. सावित्री यम देवाच्या मागे मागे चालत राहिली तिने यम धर्माची विनवणी केली. यमाने अनेक वेळा सावित्रीला परत जावयास सांगितले. अखेर सावित्रीचा हट्ट पाहून पतीच्या प्राणांखेरीज इतर तीन वर दिले. सावित्रीने आपल्या वृद्ध सासू सासऱ्यांची दृष्टी मागितली. त्यांचे राज्य मागितले. अन स्वतः ला पराक्रमी पुत्र मागितला. यमाने तथास्तु म्हंटले व यमाला सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. जेष्ठ शुद्ध त्रयोदशी ते जेष्ठ पौर्णिमा असे तीन दिवसांचे हे व्रत आहे.सावित्री ब्रम्हसावित्री सर्वदा प्रियभाषिणी ।
तेन सत्येनं मां पाही दुःख संसार सागरात ।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगो यथास्माकं भुयात जन्मानि जन्मानि ।।
विशाल भालेराव