अहेमद आणि बायकोने मिळून केला प्रथमेशचा गेम! 'ढिंशक्याव' चित्रपटात पाहा त्यांच्या अनोख्या लग्नसोहळ्याची धमाल

अहेमद आणि बायकोने मिळून केला प्रथमेशचा गेम! 'ढिंशक्याव' चित्रपटात पाहा त्यांच्या अनोख्या लग्नसोहळ्याची धमाल


अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. त्याच्याबरोबरच नवा सितारा अभिनेता अहेमद देशमुख यालाही लगीनघाई लागली आहे. 'उतावळा नवरा उडघ्यावर बाशिंग' प्रमाणे अहेमदही वरमाळा घेऊन लग्नासाठी तयार आहे. 'आलाय सीझन, घ्यावं करून, पण लग्न करणार तर फक्त पळून', असे म्हणत बोहल्यावर चढण्यास सज्ज झालेल्या अहेमदच्या या सोशल मीडियावरील पोस्टच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र हे ही तितकेच खरे आहे की अहेमद खऱ्या आयुष्यात नव्हे तर मोठ्या पडद्यावरील आयुष्यात बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधत अहेमद देशमुख अभिनित 'ढिशक्यांव' या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. 


चित्रपटाचे मोशन पोस्टर पाहता पोस्टरमध्ये अहेमदच्या गळ्यात हार पाहायला मिळतोय. मात्र या पोस्टरमध्ये गोंधळात पाडणारी बाजू म्हणजे अहेमदबरोबरच प्रथमेश परबही मुंडावळ्या बांधून, नवरा बनून त्याच्या बायकोसोबत पाहायला मिळतोय. परंतु प्रथमेशच्या बायकोच्या हातात बंदूक पाहायला मिळत असून ती बंदूक तिने प्रथमेशवर रोखून धरलेली आहे, तर प्रथमेश आणि अहेमद दोघांच्याही गळयात हार पाहायला मिळतोय. त्यामुळे नेहमी अहेमदची बायको कोण आहे? तो कोणासोबत पळून जाऊन लग्न करणार आहे? आणि हा सर्व गोंधळ काय आहे? हे गुपित १० फेब्रुवारी २०२३ ला समोर येणार आहे.   


दिग्दर्शक प्रितम एस के पाटील दिग्दर्शित 'ढिशक्यांव' हा चित्रपट निर्माते महोम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर आणि प्रितम एसके पाटील यांनी निर्मित केला असून चित्रपटाची प्रस्तुती एव्हीके एंटरटेनमेंट (AVK Entertainment), अमोल कागणे, प्रणित वायकर यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांनी उत्तमरीत्या पेलली आहे. चित्रपटाचे सहनिर्माते म्हणून राजीव पाटील, राहुल जाधव आणि उमाकांत बरदापुरे यांनी बाजू सांभाळली आहे. प्रितम एस के पाटील यांनी दिग्दर्शक आणि निर्माता अशी दुहेरी कामगिरी या चित्रपटासाठी बजावली आहे. दिग्दर्शक प्रितम एस के पाटील यांच्या खिचीक, डॉक्टर डॉक्टर आणि स्वराज्य कनिका जिऊ या तीन महत्वपूर्ण चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर त्यांचा हा चौथा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे लिखित आहे. तर चित्रपटात अहेमद देशमुख सोबत प्रथमेश परब, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा, मेघा शिंदे, प्रणव पिंपळकर, राजीव पाटील, सिद्धेश्वर झाडबुके, आसावरी नितीन, प्रसाद खैरे, साक्षी तोंडे, महेश घाग, मधु कुलकर्णी, बादशाह शेख, अमित दुधाने, शिव माने, विनया डोंगरे, हर्ष राजपूत, सोमनाथ गिरी या कलाकारांना पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. तर नवोदित अभिनेता अहेमद देशमुख 'ढिशक्यांव' चित्रपटातून स्वकर्तुत्वाने मराठी चित्रपटसृष्टीत  पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. 


'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर उत्सुकता लागून राहिली आहे ती चित्रपटाच्या कथेची. चित्रपटात हे सर्व कलाकार मिळून काय धुडगूस घालणार आहेत याकडे साऱ्या प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. आणि त्यासाठी जास्त विलंब न करता येत्या १० फेब्रुवारी २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटसुध्दा प्रेक्षकांना खुर्चीमध्ये खिळवून ठेवण्यात यशस्वी होईल, यात वादच नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.