"लवकरच मोठी घोषणा..." शरद सोनवणेंच्या त्या फ्लेक्सची जिल्ह्यात चर्चा, तर जुन्नरकर ही म्हणतात नेमकं काय घडणार?

 

Sharad Sonavane

पुणे: महाराष्ट्राचे राजकारण हे सद्या दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडींमुळे संपूर्ण देशात चर्चेत आले आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असणाऱ्या राजकीय उलथापालथीत कधी काय घडेल? हे सांगता येत नाही. आता पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये रात्रीत झळकलेल्या फ्लेक्समुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. 


नागरिकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने  केवळ काही वाक्य लिहून उभारले जाणारे फ्लेक्स कायम चर्चेचा विषय बनतात. यामध्येच एखाद्या नेत्याने अशा पद्धतीने बॅनर्स उभारल्यास काहीतरी राजकीय घडामोड घडणार, हे मात्र नक्की. जुन्नरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शरद सोनवणे यांच्याकडून लावण्यात आलेले फ्लेक्स सद्या मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहेत. "29 सप्टेंबर 2023 सर्वात मोठी घोषणा होणार" असा मजकूर लिहिण्यात आलेल्या फ्लेक्समुळे जुन्नरच्या राजकारणात चर्चेला उधाण आल आहे. 


एका बाजूला राज्यातील राजकारण अस्थिर बनले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेसचा गट आणि या गटामध्ये जाण्यावरून विद्यमान आमदार अतुल बेनके यांची असलेली संभ्रमावस्था, यावरून सध्या तालुक्यात चर्चा सुरू आहे. आता शरद सोनवणे हे नवीन काय घोषणा करणार? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 


कोण आहेत आमदार शरद सोनवणे

माजी आमदार शरद सोनवणे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून आमदार झाले होते. त्यानंतर त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा फटका बसला होता.


उद्धव ठाकरेंनी सोनवणेंना पुणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी दिली होती. मात्र जुलै महिन्यात त्यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र ठाकरेंना लिहित पदाचा राजीनामा दिला होता. आपण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. परंतु पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी मुळे शिवसैनिक खचत व संपत चाललेला होता, अशी तक्रार सोनवणेंनी केली होती.


गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेत सोनवणे त्यांच्या गटात सहभागी झाले. यावेळी २०२४ विधानसभा निवडणुकीचं तिकीट सोनवणेंना मिळण्याचं निश्चित झाल्याचंही बोललं जातं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.