पुणे:(प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएलच्या तिसऱ्या हंगामात विजयाचे स्वप्न घेऊन ‘पुनीत बालन ग्रुप’चा कोल्हापूर टस्कर्स संघ सज्ज झाला आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेला धार्मिक शुभारंभ करत संघाने हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेऊन, आरती करून आशीर्वाद घेतले. यावेळी खेळाडूंनी यंदाचा चषक कोल्हापुरात घेऊन जाण्याचा निर्धार केला.
एमपीएल ही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) मार्फत आयोजित इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवरील व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा आहे. यंदा या लीगचा तिसरा हंगाम सुरु झाला असून, कोल्हापूर टस्कर्स संघ पुन्हा जोमात मैदानात उतरणार आहे. संघाची मालकी ‘पुनीत बालन ग्रुप’चे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांच्याकडे आहे.
यंदाचा निर्धार – अंतिम ट्रॉफीवर नाव कोरण्याचा!
संघाने यापूर्वीच्या दोन हंगामातही लक्षणीय कामगिरी केली असून, पहिल्यावर्षी उपविजेतेपद मिळवले आहे. यंदा संघ अधिक संतुलित असून सर्व खेळाडू जिंकण्याच्या दृष्टीने सज्ज आहेत. उद्या (शनिवार) संघाचा पहिला सामना पार पडणार असून त्याआधी गणेशदर्शनाने शुभारंभ करण्यात आला.
‘‘यंदा आमचा कोल्हापूर टस्कर संघ हा एकदम संतुलित असून आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने खेळणार आहोत. या संघातील सर्वच खेळाडूंबाबत मी अत्यंत समाधानी आहे. यावर्षी स्पर्धेचे विजेतेपद आम्ही निश्चितपणे पटकविणार, असाच आमचा निर्धार आहे. त्यासाठी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाचे आशिर्वाद घेतले.’’ - राहुल त्रिपाठी, कर्णधार
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती दर्शनाचा सोहळा
पुण्यातील ऐतिहासिक आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरात संपूर्ण संघाने सामूहिक दर्शन घेतले. रंगीबेरंगी फड्यांमध्ये सजवलेल्या मंडपात उत्साही वातावरणात गणरायाची आरती पार पडली. यावेळी कर्णधार राहुल त्रिपाठी, अंकित बावणे, श्रीकांत मुंढे, यांच्यासह सर्वच खेळाडू व व्यवस्थापनातील पदाधिकारी उपस्थित होते.