पुणे: प्रतिनिधी पुणे शहराच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय वारशाला उचित सन्मान मिळावा, यासाठी भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रेल्वे स्थानक’ असे ठेवण्याची आग्रही मागणी केली आहे. पुणे व सोलापूर रेल्वे विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी हा मुद्दा उचलून धरला.
“पुणे हे केवळ शैक्षणिक व माहिती-तंत्रज्ञानाचे केंद्र नाही, तर हे हिंदवी स्वराज्याच्या विस्ताराचे प्रमुख केंद्र आहे. शनिवार वाडा हे त्याचे मूर्त उदाहरण आहे. बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली अटकपासून कटकपर्यंत मराठा साम्राज्य पसरले. या इतिहासाचे प्रतिबिंब पुणे स्टेशनच्या नावातून उमटणे आवश्यक आहे,” असे कुलकर्णी यांनी ठामपणे सांगितले.
पुणे स्टेशनचे नामांतर ही पहिली मागणी नाही. औरंगाबाद – संभाजीनगर, उस्मानाबाद – धाराशिव यासारख्या नावांमध्ये झालेल्या बदलांवरून राजकीय वादळे उठलेली आहेत. अशा पार्श्वभूमीवर पुणे स्टेशनचे नामकरण बाजीराव पेशवे यांच्या नावाने करणे हा मुद्दा पुन्हा एकदा महाराष्ट्रात संवेदनशील सांस्कृतिक-राजकीय चर्चेचा भाग होण्याची शक्यता आहे. विरोधक या मागणीकडे राजकीय हेतूने प्रेरित म्हणून पाहू शकतात. अनेक पुरोगामी विचारवंत आणि काही संघटना याला ‘इतिहासाचे राजकीय भांडवल’ म्हणून विरोध करण्याची शक्यता नाकारता येत नाही.