सिंहगड रस्ता : वडगाव उड्डाणपुलावर भरधाव ट्रकची धडक; तरुणाचा मृत्यू, एक जखमी

Sinhagad-Road-Speeding-truck-hits-Vadgaon-flyover-Youth-dies-one-injured

पुणे: सिंहगड रस्ता भागातील वडगाव उड्डाणपुलावर भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात सोमवारी रात्री झाला असून या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला अटक केली आहे.


मृत तरुणाचे नाव किरण पवार (वय २५, रा. श्रमसाफल्य कॉलनी, कर्वेनगर) असे असून, तो आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून जात होता. दुचाकी चालवणारा यश जयप्रकाश किरदत्त (वय २५, रा. श्रमसाफल्य कॉलनी) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, वडगाव उड्डाणपुलावरून निघालेल्या भरधाव ट्रकने दुचाकी व दोन कारला जोरात धडक दिली. यामध्ये दोन कारचे मोठे नुकसान झाले असून दुचाकीवरील किरण पवार याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. मात्र काही तासांच्या आत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ट्रकचालक महंतेश श्रीकांत अंदोडगी (वय ३७, रा. गोलसर, ता. इंडी, जि. विजयपूर, कर्नाटक) याला अटक केली.


या प्रकरणी यश किरदत्त यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवून ट्रकचालकाविरोधात भारतीय दंड विधान कलम ३०४ (ए), २७९, ३३७, ३३८ आणि मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली आहे.


या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. तसेच या रस्त्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सिंहगड रस्त्यावर नियंत्रण नसलेल्या अवजड वाहनांच्या गतीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिकांनी या मार्गावर कठोर वाहतूक नियंत्रण आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्रिय करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.