बीड: राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात गाजलेलं नाव असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावर त्यांच्या माजी सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले. “मी स्वतः तीन खुनांचा साक्षीदार आहे,” असा गंभीर दावा बांगर यांनी करताच सभागृहात एकच खळबळ उडाली.
बांगर यांनी थेट सांगितलं की, “महादेव मुंडे यांची हत्या केल्यानंतर त्याचं कातडं, हाडं आणि रक्त वाल्मिक कराडच्या टेबलावर ठेवण्यात आलं होतं. कराडने त्याच्यावर ‘शाबासकी’ दिली आणि गाड्या गिफ्ट दिल्या.” इतक्यावरच न थांबता, संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी कराडने धमकी दिली होती की तुला एका सरपंचाच्या खुनात अडकवीन, असा आरोप त्यांनी केला.
बांगर यांनी यावेळी एक कॉल रेकॉर्डिंग सादर केलं ज्यामध्ये कराड एक व्यक्तीला शिवीगाळ करताना स्पष्ट ऐकू येतो. “आता सगळ्यांचीच मदत घेतो, तू कोण रे कुत्रा!” अशी भाषा वापरून, जातीवाचक अपशब्दही वापरल्याचा दावा बांगर यांनी केला.
या कॉलमध्ये कराडवर आरोप आहे की एका व्यक्तीकडून २५ लाख रुपये कामासाठी घेतल्यावर परत न दिल्याने, त्याने रागाने शिवीगाळ करत त्याला बोलावून घेतलं, ५ लाख रुपये देऊन खंडणीच्या गुन्ह्यात अडकवलं. अशाच प्रकारे बांगर यांनी स्वतःलाही खंडणीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवलं गेल्याचा आरोप केला आहे.
बांगर यांनी म्हटलं आहे की, “या सगळ्या प्रकरणाचे पुरावे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस अधिक्षकांना देणार आहे. यानंतर सरकार आणि यंत्रणांनी काय पावले उचलायची ते पाहू.”
गेल्या काही वर्षांपासून कराड आणि बांगर यांच्यात मतभेद असल्याची चर्चा होती. बांगर यांनी कराडसोबत काम करण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्यात कटुता निर्माण झाली. “कराडनं माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आणि नंतर मला संपवायचं ठरवलं,” असा गंभीर दावा आजच्या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, आरोपांच्या गांभीर्यामुळे पोलीस यंत्रणा, गृहमंत्रालय आणि राजकीय नेते मंडळींनीही लक्ष दिलं आहे. आता यापुढे काय कारवाई होते, कोणते पुरावे समोर येतात, आणि कराड यांची काय प्रतिक्रिया असते — हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.