पुणे: श्रावण महिना हा हिंदू संस्कृतीतील उपवास, व्रत-उपवास, अनुष्ठानं व धार्मिक साधनेचा महिना म्हणून विशेष ओळखला जातो. या पवित्र महिन्याच्या अखेरच्या सोमवारी कोथरुडमध्ये शिवभक्तांनी सामूहिक रुद्र पूजनाचा दिव्य अनुभव घेतला. नामदार चंद्रकांतदादा पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित या भव्य सोहळ्यात हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या सोहळ्यात तब्बल ११०१ दाम्पत्यांनी रुद्राभिषेक केला, तर ५०० एकल व्यक्ती, तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला. त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध संकेत टोके गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेदघोष करत या संपूर्ण विधीचे आयोजन केले. वेदमंत्रांचा घनघणीत स्वर आणि “ॐ नमः शिवाय” या गजराने परिसर शिवमय झाला होता.
हिंदू धर्मशास्त्रात रुद्र पूजनाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भगवान शंकराची कृपा आणि आशीर्वाद मिळावा, आत्मिक शुद्धी व मानसिक शांतता लाभावी तसेच मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी हा पूजन विधी केला जातो. त्यामुळे हा सोहळा भक्तांच्या भावविश्वात एक आगळावेगळा अनुभव ठरला.
या प्रसंगी बोलताना नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “सामूहिक रुद्र पूजनातून केवळ महादेवाला प्रसन्न करण्याचाच प्रयत्न होत नाही, तर समाजात प्रसन्नतेचं आणि सकारात्मकतेचं वातावरण तयार होतं. हे पूजन आत्मिक समाधान देणारं असून पर्यावरणालाही शुद्धी प्रदान करतं. श्रावण महिना हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. या महिन्यातील धार्मिक अनुष्ठानं भक्तिभाव आणि एकात्मतेची भावना वाढवतात” असे ते म्हणाले.
या धार्मिक सोहळ्याला परम पूज्य भाऊ महाराज परांडे, ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे, माजी नगरसेविका मोनिकाताई मोहोळ, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, प्रभाग अध्यक्ष कुलदीप सावळेकर, डॉ. संजय उपाध्ये आदी मान्यवरांसह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक गिरीश खत्री यांनी भक्तांना आभार मानले.
श्रावणातील अखेरच्या सोमवारी कोथरुडमध्ये झालेला हा भव्य सामूहिक रुद्र पूजन सोहळा भक्तांच्या मनामध्ये दीर्घकाळ लक्षात राहील असा दिव्य आणि अध्यात्मिक अनुभव ठरला.