“धायरीकरांची डिमांड "‘दादा, पहाटेचा एक दौरा धायरीच्या डीपी रस्त्याला पण होऊ द्या की

 

Ajitdada-Pawar-s-viral-flex-for-the-road-to-Dhayari

खडकवासला: (प्रतिनिधी) पुणे शहराच्या पश्चिमेकडील महत्त्वाच्या उपनगरांपैकी एक असलेल्या धायरीत (ता. हवेली) तब्बल दीड लाख लोकसंख्या राहते. झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, नव्या गृहनिर्माण सोसायट्यांचा झालेला सुळसुळाट आणि औद्योगिक व व्यापारी हालचालींमुळे या परिसरात रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी जाणवू लागली आहे. अनेक वर्षांपासून कागदावर राहिलेल्या धायरीतील डीपी (डेव्हलपमेंट प्लॅन) रस्त्यांचे काम मार्गी लावण्यासाठी येथील ग्रामस्थांनी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे लक्ष वेधण्यासाठी अनोखी मोहीम हाती घेतली आहे.


होर्डिंग्जमधून अजित पवारांकडे साकडे

उपमुख्यमंत्री अजित पवार हे भल्या पहाटेपासून पुण्यातील विविध विकास कामांना प्रत्यक्ष भेटी देतात, कामांचा आढावा घेतात. याच पार्श्वभूमीवर धायरीकरांनी प्रमुख रस्त्यांवर भव्य होर्डिंग्ज उभारून त्यांच्याकडे साकडे घातले आहे. “दादा, पहाटेचा एक दौरा धायरीच्या डीपी रस्त्यालाही होऊन जाऊ द्या की… दादा, तुम्ही आल्याशिवाय धायरीचा डीपी रस्ता होणार नाही!” अशा आशयाचा मजकूर या होर्डिंग्जवर झळकत आहे.


धायरीतील रस्त्यांची बिकट अवस्था

धायरी परिसरातील मुख्य रस्ते अत्यंत अरुंद, काही ठिकाणी खड्डेमय असून वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ते पुरेसे नाहीत. विशेषतः धायरी-नरसिंह मंदिर चौक, सिंहगड रोडपासून धायरीतील आतील भागांना जोडणारे रस्ते, तसेच धायरी-नऱ्हे व धायरी-कात्रज जोडरस्ते प्रचंड वाहतूक कोंडीने त्रस्त आहेत. एमपीआरडीए आणि पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यात डीपी रस्त्यांची तरतूद असली तरी ती केवळ कागदावरच राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.


तातडीच्या कारवाईची मागणी

वाढत्या वाहतूक कोंडीमुळे केवळ नागरिकांनाच नाही, तर शालेय वाहतूक, रुग्णवाहिका सेवा आणि सार्वजनिक वाहतुकीलाही मोठा फटका बसत आहे. त्यामुळे धायरीतील नागरिकांनी स्थानिक प्रशासन, महापालिका व लोकप्रतिनिधींना तातडीने डीपी रस्त्यांचे काम हाती घेण्याचे आवाहन केले आहे.


अजित पवारांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा

धायरीकरांनी उभारलेल्या होर्डिंग्जची आता संपूर्ण पुण्यात चर्चा आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीप्रमाणेच या नागरिकांच्या मागणीवर तातडीने निर्णय घेतील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.