पुणे: काश्मीर खोऱ्यात तब्बल ३४ वर्षांनंतर पुन्हा सार्वजनिक गणेशोत्सवाचा गजर होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून यावर्षी पुन्हा तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार आहे. पुढील वर्षापासून काश्मीरमधील पाच जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याचा निर्धार काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात व्यक्त केला.
काश्मीरमधील श्रीनगरच्या लाल चौकात २०२३ पासून दीड आणि पाच दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होऊ लागला. त्यानंतर गेल्या वर्षी तीन ठिकाणी हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाही लाल चौक, इंदिरानगर आणि साऊथ काश्मीरमध्ये गणेशोत्सवाचे आयोजन होणार असून यासाठी पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मूर्ती विधीवत पूजा करून काश्मीरमधील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या.
केसरीवाडा गणपतीची मूर्ती लाल चौक गणेश मंडळाला, अखिल मंडईच्या शारदा गजाननाची मूर्ती श्रीनगरमधील इंदिरानगर मंडळाला, तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची मूर्ती साऊथ काश्मीरमधील मंडळाला सुपूर्द करण्यात आली.
या वेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, अखिल मंडई मंडळाचे सूरज थोरात, केसरी गणपतीचे अनिल सपकाळ, गुरुजी तालीम मंडळाचे पृथ्वीराज परदेशी, तुळशीबाग मंडळाचे विनायक कदम, जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे अध्यक्ष संजीव जावळे तसेच काश्मीरमधील मोहित भान, संदीप रैना, सनी रैना, अमित कुमार भट, संदीप कौल, शिशान चकू, उदय भट आदी मान्यवर उपस्थित होते.
लाल चौकातील गणपती यार मंडळाचे मोहित भान म्हणाले, “तीन वर्षांपूर्वी पुनीत बालन यांच्यासोबत काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा झाली. त्यांच्या सहकार्याने पहिल्याच वर्षी दीड आणि पाच दिवसांचा उत्सव सुरू झाला. मागील वर्षी तीन ठिकाणी हा उत्सव पार पडला. महाराष्ट्रात जसा गणेशोत्सव साजरा होतो, तसाच काश्मीरमध्येही हा उत्सव व्हावा, अशी आमची इच्छा आहे. पुढील वर्षी पाच ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याचे नियोजन आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने काश्मीरी पंडित पुन्हा सुखाने व समाधानाने तिथे नांदावेत, हीच प्रार्थना आहे.”