पुणे: प्रतिनिधी – हिंदुस्थानातील सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया रचणाऱ्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचा यंदाचा गणेशोत्सव धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाने उजळून निघणार आहे. बुधवार, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी १२.१५ वाजता प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्याआधी सकाळपासूनच ढोल-ताशांच्या गजरात जंगी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ऐतिहासिक संदर्भ
१८९२ साली पुण्यात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वसामान्य जनतेला एकत्र आणण्यासाठी आणि ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा देण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. पुढे १८९३ साली लोकमान्य टिळक यांनी या परंपरेला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. त्यामुळे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हे केवळ धार्मिकच नाही तर स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण प्रतीक मानले जाते. दरवर्षीच्या गणेशोत्सवात हा ऐतिहासिक वारसा जपण्याचा संकल्प ट्रस्टकडून केला जातो.
वाजत-गाजत मिरवणुकीचे वैभव
उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी सांगितले की, “गणेश चतुर्थीच्या सकाळी ८.३० वाजता मिरवणुकीला सुरुवात होईल. लाठीकाठी हा मर्दानी खेळ व केशव शंखनाद मिरवणुकीची रंगत वाढवतील. त्यानंतर सात ढोल-ताशा पथके — श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभूगर्जना, गजर, नूमवि — भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी देणार आहेत. रथाला बैलजोडी न लावता स्वयंसेवकांनीच रथ ओढण्याची परंपरा यंदाही पाळली जाणार आहे.”
“श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा यंदा जया किशोरी यांच्या हस्ते होणार आहे. गतवर्षी त्यांनी बाप्पाच्या दर्शनादरम्यान हा मान मिळावा अशी इच्छा व्यक्त केली होती. सेवेकऱ्यांसाठी ही अत्यानंदाची गोष्ट आहे.” — पुनीत बालन (उत्सव प्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)
धार्मिक आणि आध्यात्मिक सोहळा
जया किशोरी या त्यांच्या प्रेरणादायी प्रवचनांसाठी ओळखल्या जातात. भारतभरात लाखो श्रोत्यांना त्यांनी गीतेचा व जीवनमूल्यांचा संदेश दिला आहे. मागील वर्षी त्यांनी बाप्पाच्या दर्शनासाठी भेट दिली असता प्राणप्रतिष्ठेची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडत असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साह आहे.
पुढील कार्यक्रम
प्राणप्रतिष्ठेनंतर विविध धार्मिक विधी, आरत्या व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून दरवर्षी सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य दिले जाते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव, स्वच्छता मोहीम, आरोग्य शिबिरे यांसारख्या उपक्रमांचा या निमित्ताने शुभारंभ होतो.