पुणे: शहरातील 23 नामांकित सार्वजनिक गणेश मंडळांची ‘पुनीत बालन ग्रुप’ आयोजित संयुक्त दहीहंडी यंदा पूर्णपणे डिजे-मुक्त पद्धतीने, पारंपारिक वाद्यांच्या गजरात साजरी होणार आहे. हा निर्णय सणाचे सांस्कृतिक वैभव टिकवण्यासाठी आणि ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली.
गतवर्षीपासून छत्रपती शिवाजी रस्त्यावरील ऐतिहासिक लाल चौकात ही संयुक्त दहीहंडी आयोजित केली जाते. चौकाचौकात होणाऱ्या लहान दहीहंड्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी टाळणे आणि पोलिसांवरील ताण कमी करणे हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. पहिल्याच वर्षी 35 मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर यंदाही हा उत्सव पारंपारिक थाटात साजरा होणार आहे.
यंदाच्या कार्यक्रमात युवा वाद्य पथक, समर्थ पथक, रमणबाग आणि शिवमुद्रा यांचे ढोल वादन, त्यानंतर प्रभात बॅन्डचे सूर, तसेच मुंबईतील नामांकित वरळी बिट्सच्या तालावर दहीहंडी फोडली जाणार आहे. मुख्य आकर्षण म्हणून उज्जैनच्या पारंपारिक शिव महाकाल कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
संयुक्त दहीहंडीत सहभागी 23 गणेश मंडळे:
श्रीमंत पेशवे गणपती मंदिर, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुण्येश्वर महादेव मंदिर उत्सव समिती, श्री गरुड गणपती (लक्ष्मी रोड), उदय तरुण मंडळ (एफसी रोड), नागनाथ पार सार्वजनिक गणेश मंडळ ट्रस्ट, मंजुबा तरुण मंडळ (पीएमसी), फणी आळी तालीम ट्रस्ट, प्रकाश मित्र मंडळ, भरत मित्र मंडळ, त्वष्टा कासार समाज संस्था, आझाद हिंद मंडळ (जे.एम रोड), श्री शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव, श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठाण, जनता जर्नादन मंडळ प्रतिष्ठान, जनता जनार्दन मंडळ, क्रांतिवीर राजगुरू मित्र मंडळ, गणेश मित्र मंडळ (अलका चौक), भोईराज मित्र मंडळ, शिवतेज ग्रुप, नटराज ग्रुप.