ऑनलाईन क्लास शिवाय दुर्गम भागात शाळा झाली चालू , पाबे शाळेत 'पाबे पॅटर्न' च्या अंमलबजावणीला सुरुवात

पाबे शाळेत 'पाबे पॕटर्न'च्या अंमलबजावणीला सुरुवात
विशाल भालेराव 
पानशेत, दि.१६ सिंहगड टाईम्स : पुणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या वेल्हे तालुक्यातील  भौगोलिकदृष्ट्या दुर्गम व डोंगरी भागात असलेल्या पाबे (ता.वेल्हे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने लॉकडाऊनमुळे शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी अप्रतिम नियोजन केले आहे. या नाविण्यपूर्ण उपक्रमाला 'लॉकडाऊन पाबे पॕटर्न' असे नाव दिले असून या उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सोमवारी(दि.१५) सुरुवात करण्यात आली.
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पाबे शाळेने तयार केलेले 'पाबे पॕटर्न' मधील प्रत्येक वर्गाचे नियोजन अप्रतिम असून राज्यासाठी निश्चितच पथदर्शी उपक्रम असून वेल्हे तालुक्यासाठी लागू करण्यात येणार आहे. यासाठी शाळेने तयार केलेल्या नियोजनाची एक प्रत कार्यालयाकडे सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे - सुनील मुगळे, गटशिक्षणाधिकारी, वेल्हे.
 कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलेले असताना देशात, राज्यात व जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होईल या आशेवर पाणी फिरले आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असून जोपर्यंत लस निघत नाही तोपर्यंत नियमितपणे शाळा भरवायची नाही असा निर्णय येथील शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे. या निर्णयासोबतच विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू ठेवण्यासाठी अॉनलाईन शिक्षणाला फाटा देत या नव्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे.

     हा उपक्रम राज्यातील अतिदुर्गम व डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. क्रमिक पाठ्यपुस्तकांवरच आधारित नियोजन तयार केल्याने सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन चालू राहणार आहे. मोबाईल, टिव्ही, संगणक यांच्या सततच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम रोखता येणार आहे. ज्यांच्या घरी वीज कनेक्शन नाही अशा विद्यार्थ्यांना देखील उपयुक्त ठरणार आहे. ज्यांच्याकडे कसलाही मोबाईल नाही अथवा ज्या ठिकाणी नेटवर्कच नाही अशा परिस्थितीतही प्रभावी शिक्षण पध्दती ठरणार आहे.

 वर्गशिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन लाभणार आहे. मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, हिंदी या मुख्य विषयांबरोबरच कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण या वैकल्पिक विषयांचा अभ्यास करणे विद्यार्थ्यांना सहज शक्य होणार आहे.  पालकांना वेगळा अभ्यास घ्यायची गरज पडणार नाही. विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील चुका तात्काळ सुधारता येणार आहे. खासगी कोचिंग क्लासेसची गरज भासणार नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गात बसावे लागणार नसल्याने कोरोना संक्रमणाची भीती अजिबात असणार नाही.

या उपक्रमाची माहिती शिक्षकांना मिळताच पाबे शाळेने तयार केलेले नियोजन पाहून 'पाबे पॕटर्न' ला  राज्यभरातील शिक्षकांकडून मागणीसाठी फोन येत आहे. सध्या या उपक्रमाच्या पेटंटसाठी राज्याचे मुख्य सचिव व शिक्षण सचिव यांना माहिती पाठवली आहे. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळताच राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळेसाठी पाबे पॕटर्न उपलब्ध करून देणार असल्याची सांगून अधिक माहितीसाठी ९९६०१४३७७४ या नंबरवर फोन न करता मेसेज करण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कोळी यांनी सांगितले.

अशी होणार अंमलबजावणी


  • वर्गशिक्षकांनी पाठ्यपुस्तके वाटप व पंधरवड्याचे नियोजन करून विद्यार्थ्यांकडे देणे.
  • विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकाचा आधार घेऊन रोजचा अभ्यास वहीत सोडवणे.
  • स्वतःच्या अथवा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या मोबाईलवर वहीचा फोटो काढून वर्गशिक्षकांना पाठवणे. (ज्यांच्याकडे मोबाईल अथवा नेटवर्क नाही त्यांनी  आठवड्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह जवळच्या गावात अथवा रेंज असेल तेथून  पाठवणे)
  •  वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासून त्रुटी व चांगल्या बाबींची नोंद ठेवणे.
  • संबंधित विद्यार्थ्याला तात्काळ मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणे.
  • पंधरवड्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे नियोजन देण्यासाठी  विद्यार्थ्यांना न बोलवता पालकांकडे देणे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.