...म्हणून आदिवासी बांधवांसाठी धावून आले अग्निशमन दलाचे जवान

Sinhagad Times Vishala Bhalerao

सिंहगडावर वास्तव्यास असणाऱ्या गरजू नागरिकांना सिंहगडावरील गाडीतळावर एकत्रित जमवून सामाजिक अंतर ठेवून अन्नधान्याच्या किटचे वाटप केले.

विशाल भालेराव
सिंहगड टाईम्स : सिंहगडावर व आजूबाजूला कड्या कपारीत राहणाऱ्या आदिवासी गरजू नागरिकांना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन विभागाकडून अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील यांनी पढेर मेट, अमृतेश्वर मेट, कळकीचा मेट व सिंहगडावर वास्तव्यास असणाऱ्या गरजू नागरिकांना सिंहगडावरील गाडीतळावर एकत्रित जमवून सामाजिक अंतर ठेवून अन्नधान्याच्या किटचे वाटप केले.

काम देत का कुणी काम : ओझी उचलू, कुठेही राबू पण...
सिंहगडाच्या परिसरात राहणारे हे आदिवासी बांधव गडावर दही, ताक, रानमेवा विकून आपला उदरनिर्वाह भागवतात. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मागील काही महिन्यांपासून सिंहगड पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला असल्याने या आदिवासी बांधवांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच 3 जून रोजी झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक आदिवासी नागरिकांच्या घरावरील पत्रे व छप्पर उडाल्याने या नागरिकांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत आधार म्हणून अग्निशमन विभागाकडून 25 कुटुंबांना या अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.

 यावेळी हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, घेरा सिंहगड गट ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल पढेर, पोलिस पाटील निलेश चव्हाण, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, नवनाथ झोळ, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.