बारामती लोकसभेसाठी आत्तापासूनच कामाला लागा- राहुल कुल

पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवले असून त्यासाठी पदाधिकारीही नेमले आहेत. यातच पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघावर भाजपचं विशेष लक्ष असून या मतदार संघाची जबाबदारी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने व्युहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे हा मतदारसंघ भाजपने दिला आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील अलिकडेच बारामती दौरे सुरू केले असून त्यांचे सातत्याने या मतदारसंघावर लक्ष आहे. तालुका निहाय आपल्या पक्षाची ताकद किती आहे , पक्षाची बलस्थाने काय आहेत , हे आपण जाणता . येणाऱ्या काही काळात आपण  बारामती लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे  व  प्रत्येक बूथ सक्षम होण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागावे , असे आवाहन भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख व आमदार राहुल कुल यांनी केले.

राहुल कुल म्हणाले की वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी सवांद साधला जाईल. तसेच पुढील नियोजन करण्यासाठी प्रत्येक मंडलात बैठकीचे आयोजन केले जाईल.

बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी आमदार  राहुल  कुल , व पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी बाबाराजे जाधवराव यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने  पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेवाळेवाडी येथे या दोघांचाही सत्कार जिल्हा उपाध्यक्ष राहुल  शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गिरीश जगताप , सचिन लंबाते, निलेश जगताप, श्रीकांत ताम्हाणे, संजय निगडे, आनंद जगताप, राजेंद्र काळे, अमित झेंडे, माऊली चौरे, संतोष हरपळे आदिंसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.