“कविता जगायला शिकवते” कविवर्य प्रा. महादेव रोकडे


पुणे: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी लुंबिनी बुद्ध विहार, सांगवी, पुणे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, गझल काव्य संध्या समूह तसेच गौतमी महिला बचत गट, पिंपरी चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 

ह्या संमेलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या विविध भागातून एकूण ४० कवींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला. गझल काव्य संध्येत नवोदित तसेच मान्यवर कवीनी आपल्या कवितेतून उत्कृष्ट भावनाविष्कार प्रकट केले आणि उपस्थितांची वाहवा मिळवत,गझल काव्य संध्या उत्तरोत्तर रंगतदार केली.

यासमयी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महादेव रोकडे आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कविता जगायला शिकवते. मरणाच्या दारातून कविता माणसाला बाहेर काढते.इतकी ताकत कवितेमध्ये असते. फेसबुक,इन्स्टाच्या काळात कवींनी खोट्या स्तुतीत अडकून न पडता प्रामाणिक पणे लिहत रहावे.असे आवाहनही त्यांनी समस्त कविजणांना केले.

तत्पूर्वी, महाराष्ट्रात मराठी कवी संमेलने विपुल प्रमाणात होत असतात. कवींचा सहभाग देखील लक्षणीय असतो. कवितेला आणि सादरीकरणाला मंचासमोरील रसिकांकडून मनमोकळी दाद मिळत असली; तरी मंचावर सोबत बसलेल्या कविकडून हवी तशी उत्स्फूर्त दाद मात्र मिळत नाही. ती जर मिळाली तर मराठी संमेलने अधिक बहारदार होतील, असे ठाम प्रतिपादन, या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे नाट्य, चित्रपट मालिका कलावंत सुधाकर वसईकर यांनी केले.

या संमेलनात काही कविता सामाजिक पर्यावरणावर अचूक भाष्य

करणाऱ्या होत्या. स्त्री जाणीवांच्या वेध घेणाऱ्या कवितेत काही लेकीच्या होत्या, आईच्या होत्या तर काही बहिणीच्या कविता होत्या.समाजातील जळजळीत भयाण वास्तव मंडणारी सागर काकडे यांची ‘देणे घेणे’  हि कविता उपस्थिताना अंतर्मुख करून गेली. कवियत्री वाणी ताकवणे यांनी ‘कंदील ' कवितेत उजेडाचे स्त्री जीवनातील महत्व सांगत त्यांच्या जीवन शैलीत होणारा बदल अचूक दर्शविला, तर वैभव शिंदे यांनी प्रेयसीवरील उत्कट भावना आपल्या कवितेतून मिश्कीलतेने  प्रकट करत संमेलनाचे वातावरण हलके फुलके केले. माधुरी वाघमारे यांनी भाव विभोर प्रेमकविता सादर करत टाळ्या मिळवल्या. नवनाथ खरात यांनी बहिणीबद्दलच्या निर्मळ भावना गझलेतून उत्तमरित्या पेश केल्या. वसंत घाग, वि. रा. मिश्रा, डॉ. श्रीनिवास काळूंखे, देवयानी गवळी रोहिणी मदने, प्रतिमा इंगळे, माधुरी इंगळे, तानाजी शिंदे, धनराज डमरे, शंतनू पुराणिक,दिनेश कांबळे, सागर वाघमारे आदी कवींनी सुंदर कविता सादर केल्या. सर्व कवींचा सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नेत्रा भागवत थोरात (४० किलो वजनी गटात ४ थे स्थान), स्वरदा गौंडाडकर (राष्ट्रीय कराटे पटू), संगिनी मोरे(आंतरराष्ट्रीय जागतिक क्रमवारी ७२ वे स्थान कराटे पटू), समिधा विभूते(राष्ट्रीय कराटे पटू), यज्ञा सोनावणे ( राष्ट्रीय धाव पटू) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह गौरव करण्यात आला. स्त्री कर्तृत्वाचा सन्मान आणि आदर राखत गझल काव्य संध्या कार्यक्रमातून स्त्री जाणींवांचा उजागार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय स्तरावर विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुली आणि महिलांचे कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास मा. डॉ. संदीप सांगळे अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ पुणे विद्यापीठ, मोहन कांबळे (अध्यक्ष लुंबिनी विहार) प्रसिद्ध कवी जितेन सोनावणे, सांगवी पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक तेजश्री म्हशाळे, जिल्हा रुग्णालयाच्या  डॉ. वर्षा डोईफोडे (ACS), प्रा. सुनंदा काटे, शीतलताई शितोळे उज्वलाताई ढोरे, सुजाता निकाळजे, स्वरूपा खापेकर आदी महिला उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आप्पा वाघमारे यांनी केले. विद्या कदम आणि सपना कांबळे यांनी आभार व्यक्त केले. ऍड. उमाकांत आदमाने यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करून कवींना बोलतं केलं.

स्त्री कर्तृत्वाचा सन्मान आणि आदर राखणारी आणि कवी संमेलनातून स्त्री जाणीवेचा उजागार करणारी गझल काव्य संध्या संस्मरणीय ठरली. याचे परिश्रमपूर्वक आयोजन राधिका घोडके यांनी केले होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांचाही सत्कार करण्यात आला. आणि गझल काव्य संध्या संपन्न झाली.

नवोदित उद्योजिका गौतमी घोडके यांच्या “निर्वाणा” परफ्युम brand चे  मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे समाजबंध यांच्या अनिकेत शिंदे व ऋषिकेश गायकवाड यांनी महिला आरोग्य विषयक पुस्तिकांचे वाटप केले.

या कार्यक्रमाचे व्यवस्थापन अनिकेत साळुंके व  बुक कट्टा टीम, लुंबिनी बुद्ध विहार सदस्य यांनी केले. आणि आपली महत्वाची भूमिका चोख पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.