पुण्यामध्ये अल्पवयीन मुलाने कल्याणीनगरमध्ये दोघांना चिरडल्यानंतर अजित पवार काही न बोलल्याने तसेच पुण्याचा दौरा न केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते. अजित पवार यांनी आज धायरी येथे टायटन घड्याळाच्या शोरुमच्या उद्घाटनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुणे हिट अँड रन प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली. पुण्यातील कल्याणीनगर येथील घटना घडल्यानंतरच्या दिवसापासून त्याकडे माझं लक्ष होतं. कारण नसतांना या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांचे लक्ष नसल्याचे सांगितलं जात आहे. अशा प्रकारे गैरसमज समाजामध्ये पसरवलं जात आहे. सकाळपासून मंत्रालयात काम करत असतो. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्यात कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता कारवाई केली गेली पाहिजे. तसेच जो कुणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. या मताचा मी देखील असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्ट सांगितले असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
‘कारण नसताना एक गैरसमज पसरवला जातोय की…
मी 20 आणि 22 तारीख या दोन्ही दिवशी सकाळी 9 वाजेपासून मंत्रालयात होतो. मी या घटनेच्या सर्व घडामोडींकडे लक्ष ठेवून होतो. माझं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं झालं होतं. देवेंद्रजी मला म्हणाले की, मी तातडीने पुण्याला निघालो आहे. मी स्वत: त्याकडे जातीने लक्ष घालणार आहे. त्यांनी लक्ष घालून पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. कारण नसताना एक अशा प्रकारचा गैरसमज समाजात केला जातोय की, या प्रकरणाकडे पालकमंत्र्याचं लक्ष नाही”, असा खुलासा अजित पवारांनी केला.
सुनील टिंगरे यांनी देखील या संपुर्ण प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. त्याच्यामध्ये काय आणि कसं घडलं आहे ? ते सांगितलं आहे. त्यासंदर्भामध्ये एकदा चौकशीच्या सुचना दिल्या असून सत्य काय ते लवकरच बाहेर येईल. असेही अजित पवारांनी सांगितलंय. यातच यामध्ये जो कुणी दोषी असेल, ते कितीही मोठे असले, कितीही श्रीमंतांच्या बापाचा पोरगा असेल तरी त्याच्यावर पद्धतीशीरपणे कायद्यान्वेय कारवाई होईल. असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.