लोणी काळभोर: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात रविवारी सकाळपासून इराणचे राष्ट्रीय झेंडे आणि तेथील सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी यांची पोस्टर्स झळकू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सदर दृश्याचा व्हिडीओ काही तासांतच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आश्चर्य, गोंधळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले.
सदर प्रकाराची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिसांनी सोमवारी सकाळी तातडीने धाव घेऊन सर्व झेंडे, बॅनर आणि पोस्टर्स हटवले. मात्र हे झेंडे आणि पोस्टर्स नेमके कोणी लावले, कोणत्या उद्देशाने लावले, आणि यामागे कोणत्या संघटना किंवा व्यक्ती आहेत, याचा तपास अद्यापही सुरू आहे.
या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काही नागरिकांनी धार्मिक किंवा राजकीय हेतूने हा प्रकार घडवून आणण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे. स्थानिक नागरिक म्हणाले, "हे आमच्या भागात कधीच पाहिलं नव्हतं. इराणचे झेंडे आणि अयातुल्ला यांची पोस्टर्स का लावली गेली? यामागे नेमकं काय उद्दिष्ट आहे?"
लोणी काळभोर पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, "सदर घटनेची गंभीर दखल घेतली असून, सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक माहिती आणि सायबर यंत्रणांच्या मदतीने याचा तपास सुरू आहे. काही व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे."