सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर - द बिगिनिंग’ १३ जूनला होतोय प्रदर्शित; ड्रग्ज माफियांविरुद्ध कॉलेज तरुणाईचा थरारक लढा

Suspense-thriller-marathi-movies-Shatir-The-Beginning-to-be-released-on-June-13


पुणे : समाजात वाढत चाललेली अंमलीपदार्थांची समस्या, गुन्हेगारी आणि तरुणाईवरील परिणाम या विषयावर बेतलेला सस्पेन्स थ्रीलर ‘शातिर - द बिगिनिंग’ हा मराठी चित्रपट येत्या १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियावर झळकला असून, ‘नडायची मस्ती आणि भिडायची खाज आम्ही कॉलेजची पोरं बरोबरच घेऊन चालतो’ अशा संवादांनी भरलेल्या ट्रेलरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.


चित्रपटातील कलाकारांनी प्रदर्शानपूर्व पत्रकार परिषदेत माहिती दिली. यापूर्वी त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती केली, तसेच श्री शंकर महाराज समाधी स्थळाला भेट देत शुभेच्छा घेतल्या.


सत्यकथेवर आधारित ‘शातिर’

आजच्या तरुणाईला केंद्रस्थानी ठेवून सत्यकथेवर आधारित असलेला हा चित्रपट श्रियांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्सच्या माध्यमातून निर्मित करण्यात आला असून रेश्मा वायकर यांनी निर्मिती केली आहे. तर सुनील सुशीला दशरथ वायकर यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे.


याबाबत बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, "ड्रग्ज माफिया, पोलिस यंत्रणा आणि त्यांच्यात सापडलेले महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्यातील संघर्ष दाखवताना एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न चित्रपटातून केला आहे. बाह्य दहशतवाद जितका धोकादायक आहे, तितकाच ड्रग्ज हा अंतर्गत दहशतवाद आहे."


रेश्मा वायकर यांची दमदार भूमिका

चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री आणि निर्मात्या रेश्मा वायकर म्हणाल्या, "'पोरी आम्ही मराठी पोरी' या गाण्याला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात देखील अंमलीपदार्थ सहज उपलब्ध होत आहेत, आणि त्यामुळे तरुणाई मार्गभ्रष्ट होत आहे. या गंभीर विषयावर चित्रपट सादर करणे हे माझ्यासाठी भावनिक आणि कलात्मक दोन्ही प्रकारचं आव्हान होतं."


अभिनेते आणि तांत्रिक बाजू

चित्रपटात योगेश सोमण, रमेश परदेशी, अनिल नगरकर, मीर सरोवर, रामेश्वर गीते, रमा नाडगौडा, निशांत सिंग, वेद भालशंकर आणि अभिमन्यू वायकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

संगीतकार रोहित नागभिडे यांच्या संगीतात वैभव देशमुख यांची गीतरचना असून, वैशाली सामंत, मुग्धा कऱ्हाडे आणि श्याल्मली खोलगडे यांच्या आवाजात चित्रपटातील गीते सजली आहेत.


थरारक लढा आणि सामाजिक संदेश

‘शातिर - द बिगिनिंग’ या चित्रपटातून तरुणाईला सावरणारा सामाजिक संदेश दिला जात असून, त्याचबरोबर ड्रग्ज माफियांविरुद्धच्या थरारक लढ्याचा अनुभव प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.