पुणे: समाजात महिलांचा सहभाग वाढावा, त्यांना सामाजिक लढ्यांमध्ये अग्रस्थान मिळावं, अशी अपेक्षा असतानाच पुण्यात एका सामाजिक चळवळीत सक्रिय महिलेला जुन्या सहकाऱ्याने अश्लील मेसेज पाठवत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आंदोलनाच्या फोटोवरून महिलेला उद्देशून आलेल्या या अश्लील आणि अवमानकारक मजकुरामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सामाजिक चळवळीत सक्रीय असलेल्या एका महिलेला व्हॉट्सॲप स्टेटसवरून अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला असून, याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महिला नुकत्याच पार पडलेल्या एका आंदोलनात सक्रीय सहभागी होती. आंदोलनानंतर तिने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर आंदोलनाचे फोटो आणि संबंधित विचार शेअर केले होते. मात्र, याच स्टेटसवरून (पूर्ण नाव अस्पष्ट ) या तिच्या संघटनेतील जुन्या सहकाऱ्याने तिच्यावर अश्लील आणि अवमानकारक भाषेत मेसेज करून तिचा मानसिक छळ केला, असा आरोप आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला अनेक आक्षेपार्ह आणि अश्लील मेसेज पाठवले आहेत. “तुझं आंदोलन सक्सेसफुल झालं का?”,“आंदोलन करून काय फायदा होतो?”,“छान छान कपडे घालून आंदोलन होतं का?”, “तू किती गोरी चिकनी दिसतेस!”, “आंदोलनात ज्या साडीमध्ये आली होतीस, तीच साडी घालून या मर्द गड्याला भेट.” या सर्व मेसेंगमुळे पीडित महिला त्रस्त झाली, महिलेला लज्जा वाटली आणि तिने थेट पोलिसांकडे धाव घेतली.
या घटनेमुळे संबंधित संघटनेसह इतर कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. "महिला आंदोलनात भाग घेऊ लागल्या की त्यांच्याकडे शरीरदृष्टीने पाहणं ही मानसिक विकृती आहे. अशा प्रकारच्या कृत्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे," अशी संतप्त प्रतिक्रिया काही महिला कार्यकर्त्यांनी दिली.
या घटनेने पुन्हा एकदा महिला सार्वजनिक आणि सामाजिक आयुष्यात सुरक्षित आहेत का? हा प्रश्न समोर आणला आहे. एकीकडे महिला रस्त्यावर उतरत आहेत, आवाज उठवत आहेत, आणि दुसरीकडे त्यांच्यावर मानसिक व लैंगिक स्वरूपाचे हल्ले होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.