सिंहगड रोड: सिंहगड रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या अनागोंदी कारभारामुळे मंगळवारी सकाळी माणिकबाग ते विठ्ठलवाडीपर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागला. सध्या संतोष हॉलपासून राजाराम पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर, विशेषतः हिंगणे चौक परिसरात, उड्डाणपुलाच्या रॅम्पचे काम सुरू आहे. यामुळे येथे वाहनांना केवळ एक ते दीड लेनचा रस्ता उपलब्ध आहे. त्यातच ठेकेदाराने संतोष हॉलपासून हिंगणे दिशेने पदपथ तयार करण्यासाठी शिल्लक रस्ताही खोदून टाकला आहे. परिणामी शेकडो वाहनचालक आणि प्रवाशांना रोजच्या प्रवासात अर्धा तासांपेक्षा अधिक वेळ खर्ची पडतो आहे.
पाऊस, चिखल, आणि रस्त्यावरच उभे यंत्र — हीच कोंडीची सूत्रं
खोदकामासाठी आणलेले जेसीबी आणि डंपर थेट रस्त्यावरच उभे ठेवण्यात आले आहेत. त्यात पावसामुळे खोदलेल्या रस्त्यावर चिखल साचल्याने वाहनांची घसरगुंडी सुरू झाली. फनटाइम ते राजाराम पूल या दरम्यानच्या रस्त्यावर महापालिकेच्या उड्डाणपुलाचे काम सुरू असताना, पादचाऱ्यांसाठी आवश्यक असलेले पदपथही खोदून टाकल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर धोका अधिक
या रस्त्यावर असलेल्या विठ्ठल मंदिरात येत्या रविवारी आषाढी एकादशीनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. अशावेळी हे काम अर्धवट राहिल्यास आणि रस्ते मोकळे नसल्यास गोंधळ, अपघात आणि वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे. या संभाव्य परिस्थितीसाठी जबाबदारी कोणाची, हा प्रश्न उभा राहतो.
काम प्रलंबित, नियोजन गोंधळात
जूनअखेरीस रॅम्पचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र दोन महिने उलटूनही काम संथ गतीने सुरू आहे. याचवेळी पदपथाचे खोदकाम सुरू करून ठेकेदाराने स्वतःहून कोंडीला आमंत्रण दिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वरून रस्त्यावर अनधिकृत पार्किंग, महावितरणचा डेपो, खासगी नर्सरी आणि व्यावसायिकांचे अतिक्रमण — यामुळे रस्त्यावरच चालावे लागत असल्याने पादचाऱ्यांचेही हाल सुरू आहेत.